पशुपालन व्यवसाय ठप्पच्या वाटेवर
By Admin | Updated: July 19, 2016 00:39 IST2016-07-19T00:39:59+5:302016-07-19T00:39:59+5:30
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी गाई व म्हशी पाळतात.

पशुपालन व्यवसाय ठप्पच्या वाटेवर
समस्या चाऱ्याची : पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
भंडारा : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी गाई व म्हशी पाळतात. परंतु सध्या चाऱ्याची टंचाई व दुधाचे कमी भाव यामुळे परिसरातील अनेक गावांत पशुपालन व्यवसाय डबघाईस आला आहे. दूध उत्पादनाचा खर्चाच्या तुलनेत दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या दैनंदिन गरजांचा खर्च भागवितात. मात्र सध्या गाई-म्हशींच्या किंमती ३० ते ६० हजार रूपयांपर्यंत आहेत. दुष्काळ व महागाईच्या संकटाचा फटका या मुक्या जनावरांनाही बसत आहे. पशुखाद्य, वैरण-चारा, जनावरांचे आजार, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत खासगी डॉक्टरांकडून उपचार करणे आदी समस्यांमुळे दुग्ध उत्पादक शेतकरी त्रस्त होवून गेले आहेत. या समस्यांमुळे दुग्ध उत्पादनात मोठ्याने घट झाली आहे. हवे तसे दूध नागरिकांना उपलब्ध होत नाही. भेसळ दुधाने दैनंदिन गरजा भागवावे लागत आहे. मागील वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे व यावर्षी विलंबाने आलेल्या मान्सूनमुळे सध्या जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यामधून पशुपालक दुग्ध उत्पादकांना कवडीची मदत मिळत नाही. अनेक योजनांपासून शेतकरी अनभिज्ञच आहेत. अनेक योजनांची त्यांना माहितीच होत नाही. दुधाळ जनावरांसाठी लागणाऱ्या पौष्टीक आहाराचे दर गगणाला भिडले आहेत. त्या तुलनेत दुधाचे दर मात्र फारच कमी आहेत. अशात हा पिढोनपिढ्यांचा व्यवसाय करावा तरी कसा? असा प्रश्न दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. (नगर प्रतिनिधी)