विनापरवानगीने कापली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:07+5:30
वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी चारगाव येथील भीमराव मोटघरे यांनी केली आहे.

विनापरवानगीने कापली झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी चारगाव येथील भीमराव मोटघरे यांनी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात भीमराव मोटघरे यांनी नमूद केले आहे की, चारगाव येथे गट क्रमांक ५२/२ व ५२/३ मध्ये सामूहीक शेती आहे. या शेतातील ३१ झाडे वामन पांडूरंग डोंगरवार व लाखनी येथील मितेश गिºहेपुंजे यांनी वनविभाग किंवा अन्य विभागाची परवानगी न घेता तोडून (चोरून) नेऊन विक्री केली. यासंबंधात साकोली पोलीस ठाण्यात गैरअर्जदारांच्या बयाणात या आशयाची बाबही नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना साकोलीतील सहाय्यक वनसंरक्षक यांचे पत्र असतानाही अर्जदाराला न्याय मिळालेला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांशी संगनमत असल्यानेच आरोपीतांवर कारवाई होत नसल्याचे म्हटले जात आहे. पोलीस विभागही डोंगरवार व गिऱ्हेपुंजे यांची पाठराखण करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
साग झाडासह अन्य झाडे तोडून नेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, झाडांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन अहवालाच्या प्रतीसह पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आले आहे.
सागाच्या झाडांचाही समावेश
चारगाव शेतशिवारातून तोडण्यात आलेल्या ३१ वृक्षांपैकी सागाच्या झाडांचाही समावेश आहे. शेतशिवारातील वृक्ष किंवा झाडे तोडण्यासाठी वनविभाग किंवा वेळप्रसंगी महसूल प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वृक्षतोडीच्या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनासह अन्य विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.