निलज बुज रेतीघाट विरोधात शिवसेनेचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:15+5:302021-03-09T04:38:15+5:30
करडी (पालोरा) : मोहाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आज सकाळी तालुकाध्यक्ष अनिल सारवे यांच्या नेतृत्वाखाली निलज बुज रेती घाटातील गैरप्रकाराविरोधात ...

निलज बुज रेतीघाट विरोधात शिवसेनेचा हल्लाबोल
करडी (पालोरा) : मोहाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आज सकाळी तालुकाध्यक्ष अनिल सारवे यांच्या नेतृत्वाखाली निलज बुज रेती घाटातील गैरप्रकाराविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. थेट वैनगंगा नदीपात्रातून जेसीबीने व सीमाकनाबाहेरील क्षेत्रातून होत असलेले उत्खनन आणि वाहतूक बंद करण्यात यावी. स्थानिक ट्रॅक्टरचालकांना प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
निलज बुज नदी घाट सुरू करताना प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली नाही. ग्रामपंचायतीला लिलाव झाल्याचे पत्र ठेकेदार किंवा संबंधित विभागाच्या यंत्रणेने दिले नाही. स्थानिक ट्रॅक्टरचालकांना व मजुरांना कामावर न घेता बाहेरील ट्रॅक्टरचालक, मालक व मजुरांना रोजगार दिला जात असल्याचा आरोप ठेकेदार व यंत्रणेवर यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे करडी पोलीस प्रशासनाची धावपळ झाली. ठाणेदार नीलेश वाजे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्या समस्या व अडचणी आणि मागण्या समजून घेत मोहाडी तहसीलदार, रेती घाटाचे ठेकेदार फुलसुंगे यांना माहिती दिली. पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ठेकेदार फुलसुंगे यांच्यासोबत आंदोलकांनी चर्चा केली. सीमांकनाचे आत ट्रॅक्टरने उत्खननाचे आश्वासन तसेच स्थानिकांना रोजगाराचे प्राधान्य आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याचे आश्वासन आंदोलकांना घाटमालकांच्यावतीने यावेळी देण्यात आले. जेसीबीने थेट उत्खनन केल्यास जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाईल. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून कारवाई करण्याची गरज आहे. रेती तस्कारांविरोधात नागरिक संतापले असून, प्रशासनाने थेट कारवाई करून दिलासा देण्याची गरज आहे. अनेकदा तक्रार होत असतानाही प्रशासन कारवाई करीत नसल्याची ओरड आहे.
तहसीलदारांना शिवसेनेतर्फे निवेदन
n निलज बुज रेती घाटावर आंदोलन सुरू असल्याची व आंदोलकांची आपणाशी चर्चा करण्याची तयारी दाखवल्याची माहिती दिली असतानाही मोहाडी तहसीलदारांनी आंदोलनाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. कारवाईसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.