Shiv Sena in East Vidarbha ready to dominate | पूर्व विदर्भात शिवसेना वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत
पूर्व विदर्भात शिवसेना वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत

मंत्रिपदाची संधी : महाविकास आघाडीच्या सरकारने आशा पल्लवित
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि अलिकडे भाजपचा गढ झालेल्या पूर्व विदर्भात राज्यात सत्ता स्थापनेनंतर शिवसेना आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाल्याने पूर्व विदर्भात पक्ष विस्ताराची संधी चालून आली आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात महत्त्वाचे मंत्रिपद देऊन पूर्व विदर्भात शिवसेना आपले पाय घट्ट रोवण्याच्या तयारीत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रिपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. शिवसेनेची मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ताकद असली तरी पूर्व विदर्भ मात्र दुर्लक्षित राहिला. युतीच्या काळात पूर्व विदर्भात शिवसेनेला विस्ताराची योग्य संधीच मिळाली नाही. मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे. पश्चिम विदर्भात शिवसेना आपले वर्चस्व राखून आहे. परंतु अलिकडच्या काळात पूर्व विदर्भात शिवसेनेचे हवे तसे वर्चस्व नाही. एक दोन शिलेदार निकराची झुंज पूर्व विदर्भात देत आहेत. युतीच्या काळात त्यांचेही अप्रत्यक्ष खच्चीकरणच झाले. आता प्रत्यक्ष सत्ता हाती असल्याने शिवसेना पूर्व विदर्भात पाय घट्ट रोवण्याच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भात शिवसेनेची पाटी कोरी आहे. मात्र भंडारातून नरेंद्र भोंडेकर आणि रामटेकमधून आशिष जयस्वाल अपक्ष निवडून आले. त्यांनी सत्ता स्थापनेपूर्वीच शिवसेनेला बिनशर्थ पाठिंबा दिला. शिवसेनेचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी सुरूवातीपासून भंडारा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याचा आग्रह धरला होता. परंतु भाजप-शिवसेना निवडणुकपूर्व युतीत भंडाराची जागा मित्र पक्षासाठी सोडण्यात आली. त्यामुळे भोंडेकरांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय संपादित केला.
निवडणूक निकालाच्या दुसऱ्यादिवशी त्यांनी थेट मुंबई गाठत शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू होत्या. मुख्यमंत्री पदावरून राजकीय समीकरणे बदलली. मुख्यमंत्री पदाची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती आली. त्यामुळे पूर्व विदर्भात शिवसेना विस्ताराची संधी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान होताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
आमदार नरेंंद्र भोंडेकर यांच्याकडे मोठे संगठन कौशल्य आहे. तरूणांची मोठी फौज त्यांच्याजवळ आहे. विविध प्रश्नांवर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलने केली आहेत. त्यामुळे शिवसेना पूर्व विदर्भात विस्तारासाठी नरेंद्र भोंडेकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याच्या तयारी असल्याचे माहिती आहे. यातून शिवसेनेला पूर्व विदर्भात विस्ताराची मोठी संधी सध्या चालून आली आहे.

भंडारातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आता मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यामुळे आता शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shiv Sena in East Vidarbha ready to dominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.