लिंगभेदाच्या भावनेत पोटातच कुस्करतात ‘कळ्या’ !
By Admin | Updated: March 8, 2016 00:26 IST2016-03-08T00:26:33+5:302016-03-08T00:26:33+5:30
नवऱ्याला मुलगी नको असते, ती लिंगभेदाच्या भावनेने. पण त्या होणाऱ्या मुलीच्या आईला मुलगी नको असते...

लिंगभेदाच्या भावनेत पोटातच कुस्करतात ‘कळ्या’ !
आज जागतिक महिला दिन : महिलांच्या अवस्थेबाबत चिंतनाची गरज
प्रशांत देसाई भंडारा
नवऱ्याला मुलगी नको असते, ती लिंगभेदाच्या भावनेने. पण त्या होणाऱ्या मुलीच्या आईला मुलगी नको असते ती निरूपाय म्हणून. मुलगी म्हणून किंवा बाई म्हणून आपण काय भोगत आहोत हे तिला अनुभवाने माहीत असते. म्हणून असे भोग भोगणारा एक जीव जन्माला न घातलेलाच बरा, अशी तिची अगतिकतेची भावना असते.
परंतु असे असले तरी आपण मुलीला जन्म देऊ आणि या समाजातल्या दुय्यम वागणुकीशी टक्कर देऊन सन्मानाने जगायला तिला शिकवू, परंतु कोणत्याही परिस्थितीत तिला जन्म देऊ असा तिचाही निर्धार नसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात भारतामध्ये कोट्यवधी स्त्री अर्भक (कळ्या) पोटातच खुडल्या गेल्या असतानाही डॉक्टरला शिक्षा झाल्याचे प्रमाण बोटावर मोजण्या इतकेच आहे.
आज जागतिक महिला दिन पाळला जात आहे. या निमित्ताने महिलांची स्थिती, त्यांची प्रगती आणि त्यांच्या विषयी समाजात असलेला दुजाभाव याच्या निमित्ताने काही चिंतन व्हावे, अशी आज अपेक्षा असते. जगाची किंवा देशाची लोकसंख्या मोजलीच तर साधारणपणे लोकसंख्येचा ५० टक्के भाग महिलांचा असतो हे तर उघडच आहे.
परंतु समाजामध्ये लिंगभेदाची भावना एवढी प्रबळ असते की, लोकसंख्येच्या ५० टक्के असून सुद्धा महिलांची अवस्था वाईटच असते आणि एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिलांच्या अवस्थेचा विचार करण्यासाठी वर्षातून केवळ एक दिवस पाळला जातो. वास्तविक पाहता वर्षातले ३६५ दिवस महिला दिनच पाळला पाहिजे आणि महिलांच्या अवस्थेविषयी समाजात सातत्याने चिंतन केले गेले पाहिजे. पण तसे होत नाही आणि केवळ महिला दिन पाळून फारसे काही साध्य होत नाही. कारण महिलांविषयीची हिणकस भावना आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेली असते.
लिंगभेदामुळे महिलांच्या वागण्याला, बोलण्याला, प्रगती करण्याला आणि पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर काम करण्याच्या तयारीला खूप मर्यादा येत असतात. स्त्री-पुरुष समानता पाळण्याचे कितीही निश्चय केले तरी या मर्यादा काही संपत नाहीत. त्यामुळेच या मर्यादांचे भान ठेवूनच महिलांच्या स्थितीचा विचार केला जात असतो. असे असूनही अनेक महिलांनी काही क्षेत्रामध्ये पुरूषांनाही मागे टाकून खऱ्या अर्थाने पुरूषार्थ घडवलेला आहे. पण तरी सुद्धा महिलांना समान अधिकार देण्यास पुरूष तयार नसतात. प्रत्यक्षातल्या व्यवहारामध्ये पुरूष महिलांना समान लेखायला आणि त्यांना तशी वागणूक द्यायला सहजासहजी तयार होत नाहीत. त्यामुळे मुख्य प्रश्न मनोवृत्तीचा आहे.
महिलांच्या संदर्भात विचार करताना एक दुर्दैवी वस्तुस्थिती फारच ठळकपणे जाणवत असते आणि ती म्हणजे महिलांची अवनत अवस्था आणि त्यांचे गौण स्थान यांना पुरूषांइतक्या स्त्रियाच जबाबदार असतात. अलिकडच्या काळामध्ये स्त्री आणि पुरूष या दोघांच्याही मनातल्या या गौण स्थितीसंबंधीच्या भावनेमुळे लोकसंख्येतले मुलींचे प्रमाण कसे कमी होत चाललेले आहे याची आकडेवारी तर आपण नित्त्यच वाचत असतो. गेल्या काही वर्षापासून लग्नाच्या बाजारातली स्थिती बदलली आहे. पूर्वी मुलींच्या बापाला वर संशोधनासाठी भटकावे लागत असे. परंतु आता मुलांचे बाप वधू संशोधनासाठी भटकायला लागले आहेत. विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या काही सोयींचा गैरवापर केल्यामुळे समाजातल्या श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे. समाजातली एक विसंगती अशी की, ज्या लोकांपर्यंत वैद्यकीय व्यवसायातल्या त्या आधुनिक सोयी पोचलेल्या नाहीत त्या गरीब आणि अशिक्षित वर्गामध्ये मात्र ही विसंगती आढळत नाही.
संख्या कमी मात्र प्रथा सुरूच
सुशिक्षित वर्गालाच मुलीच्या हुंड्याची जास्त काळजी आहे. मग यांना सुशिक्षित का आणि कसे म्हणावे, असा प्रश्नच पडतो. मुली कमी असल्या तरी अजूनही मुलीच्या बापाने मुलाच्या बापाला हुंडा दिला पाहिजे, हा आग्रह कायमच आहे. मुलाचा बाप गरजू असला तरी मुलीच्या बापानेच हुंडा दिला पाहिजे अशा या आग्रहातूनही या बदलत्या स्थितीत सुद्धा मुलीलाच गौण मानण्याची प्रथा कशी जारी आहे, हे लक्षात येते.
पुरूषांची मनोवृत्ती बदलणे गरजेचे
अनेक कार्यालयांमधून महिला अधिकारी आणि पुरूष शिपाई असतात. मात्र या शिपायांना आपण एका महिलेच्या हाताखाली काम करतोय याची एक वेगळी खंत वाटत असतेच. महिला कितीही सुधारल्या तरी त्या शेवटी महिलाच आणि बायकांना मुळात अक्कलच कमी असते, असा पुरुषांचा सरसकट समज असतो. ही पुरूषी मनोवृत्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत समाजातला महिलांचा सन्मान कधी वाढणार नाही.