लोकांच्या आरोग्यासाठी झटणारा नि:स्वार्थ सेवाकर्मी
By Admin | Updated: July 1, 2014 01:19 IST2014-07-01T01:19:08+5:302014-07-01T01:19:08+5:30
‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्’ हे आयुर्वेदातील ब्रीद अंगी भिनवून भंडाऱ्यातील एक आयुर्वेदिक डॉक्टर नित्यनेमाने दररोज लोकांना सेवा देत आहे. जो-जो त्यांच्या रुग्णालयात जातो त्या-त्या

लोकांच्या आरोग्यासाठी झटणारा नि:स्वार्थ सेवाकर्मी
आज ‘डॉक्टर्स डे’ : वनस्पतीच्या फळ, फुले, पाने, मुळे, साल, बियांपासून तयार करतात औषध
भंडारा : ‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्’ हे आयुर्वेदातील ब्रीद अंगी भिनवून भंडाऱ्यातील एक आयुर्वेदिक डॉक्टर नित्यनेमाने दररोज लोकांना सेवा देत आहे. जो-जो त्यांच्या रुग्णालयात जातो त्या-त्या रुग्णाला सेवा देण्यात ते कुठलीही कसर सोडत नाहीत. रुग्णांनी पैसे दिले तरी ठीक नाही दिले तरी ठीक. परंतु कर्तव्यात कसूर करायची नाही, असा त्यांचा धर्म. आजच्या काळात साध्या आजाराचेही भरमसाठ शुल्क घेणाऱ्या डॉक्टरांच्या दुनियेत आज ‘डॉक्टर्स डे’ च्या पार्श्वभूमीवर या सेवाव्रतीचे कार्य मोलाचे ठरणारे आहे.
विश्वनाथ नागदेवे असे या सेवाव्रती आयुर्वेदीक डॉक्टरचे नाव. भंडारा येथील मोठा बाजार चौकात भाड्याने घेतलेल्या आठ बाय आठच्या छोटेशा खोलीत ते नाडी तपासून औषध देतात. सकाळी १० ते सायंकाळी ५ असा त्यांचा दिनक्रम आहे. आपण आयुर्वेदाकडे कसे वळले, या प्रश्नावर ते म्हणाले, जेव्हा कळू लागले तेव्हापासूनच आयुर्वेदाची ओढ लागली.
वयाच्या २० व्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे वनस्पती औषधाचे गाढे अभ्यासक चंदूबाबा धोटेकर यांना भेटलो. चंदूबाबा वनस्पतीच्या फळ, फुले, पाने, मुळे, साल, बिया आदीपासून औषध तयार करुन गोरगरीब रुग्णांना औषध द्यायचे. आपणही त्यांच्याकडे राहून ज्ञान घ्यायचे आणि आपल्या गावात सेवा द्यायची, असा त्यांनी निर्धार केला.
पाच-सहा वर्षे त्यांच्याकडे राहून त्यांनी औषधोपयोगी वनस्पतीचे ज्ञान घेतले. त्यानंतर भंडाऱ्यात निशुल्क सेवा कार्य सुरू केले. त्यावेळी लोक त्यांची चेष्टा करायचे. परंतु त्यांनी चेष्टेला कधी थारा दिला नाही. मोफत सेवा कार्य सुरू असतानाच रुग्णांची गर्दी होऊ लागली.
त्याच काळात त्यांना मोहाडीचे तुर्रीबाबा पात्रे यांनी ‘आता तु मोफत सेवा देऊ नकोस’ कारण लोकांना फुकटचे मोल नसते, असा मित्रत्वाचा सल्ला दिला. त्यानंतर नागदेवे यांनी नाममात्र शुल्क घेणे सुरु केले. तरीसुद्धा ते रुग्णांनी दिले तेवढ्या शुल्कावर समाधान मानतात. रुग्णांना औषध कशा पद्धतीने घ्यायचे हे ज्या कागदावर लिहून देतात त्यावर काविळ, उच्च रक्तदाब, श्वेतप्रदर या आजाराचे मोफत औषध दिले जात असल्याचे लिहून ठेवले आहे.
मोफत औषधी देता तर उदरनिर्वाह कसा होतो यावर ते म्हणाले, माझ्या गरजा कमी आहेत. त्यामुळे खर्च कमी आहे. शेती असल्यामुळे आर्थिक विवंचनेचा प्रश्न नाही, परंतु आपल्या सेवेने लोकांचे कल्याण होत असेल तर वाईट काय? असा त्यांचा प्रतिप्रश्न आहे.
२०१३ मध्ये गडचिरोली वनविभागाने वनस्पतीपासून वनौषधी तयार करण्याची योजना आखली. त्यासाठी विदर्भातून वनस्पती अभ्यासकांना बोलाविले. त्यात विश्वनाथ नागदेवे हे अग्रक्रमावर होते. त्यांच्याकडून जंगलातील वनस्पतींची माहिती जाणून घेतली. त्यांनी औषधोपयोगी वनस्पतीच्या नावासह फळ, फुले, पाने, मुळे, साल, बियांपासूनचे औषध कोणत्या आजारासाठी उपयुक्ततेची माहिती दिली. त्यानंतर आता वनविभागाने वनौषधी तयार करुन बाजारात विक्रीला आणले आहे.
भंडाऱ्यात राहून आयुर्वेदीक सेवा देणाऱ्या नागदेवे यांच्याकडे चंद्रपूर गडचांदूर, अमरावती, यवतमाळ, नागपूरसह तेलंगणातील आदिलाबाद, छत्तीसगडमधील भिलाई, रायपूर, मध्यप्रदेशातील जबलपूर, बालाघाट, बैतूल, मय्यर येथून रुग्ण येत असतात. इतक्या दूरवरुन येणारे रुग्णांनी पैसे दिले तर घ्यायचे नाही तर ‘स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्’ असे म्हणत सेवा करायचे असा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)