स्वयंरोजगारातून साधली ‘नवदुर्गां’नी आत्मोन्नत्ती
By Admin | Updated: November 24, 2014 22:52 IST2014-11-24T22:52:13+5:302014-11-24T22:52:13+5:30
व्यवसाय म्हटला की, पुरूषांची मक्तेदारी असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. कोणत्याही कामात पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करण्यापेक्षा समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा संकल्प

स्वयंरोजगारातून साधली ‘नवदुर्गां’नी आत्मोन्नत्ती
प्रशांत देसाई- भंडारा
व्यवसाय म्हटला की, पुरूषांची मक्तेदारी असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळते. कोणत्याही कामात पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करण्यापेक्षा समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या भंडारा येथील नऊ बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन उपहारगृह चालविण्याचा संकल्प केला. माविमच्या सहकार्यातुन या नवदुर्गांनी एकत्रित येऊन उपहारगृह चालविण्यासाठी टाकलेले पाऊल वाखाणाण्याजोगे आहे.
उराशी बाळगलेले स्वप्न कृतीत उतरवून स्वप्नांना उंच भरारी देण्यासाठी प्रोत्साहनाची गरज भासते. मात्र त्यादृष्टीने टाकलेल्या प्रत्येक पावलांना ठेचा बसतात. त्यामुळे खचुन न जाता त्याचा सामना केल्यास आभाळही ठेंगणे वाटेल, ही प्रचिती ‘अन्नपूर्णा महिला उत्पादक बचतगट’च्या महिलांना आली आहे.
वेगवेगळ्या गावातील नऊ महिला एकत्र येऊन स्वयंरोजगारातुन आत्मोन्नत्ती करण्यासाठी बांधलेली खुणगाठ समाजासमोर आदर्श ठरणारी आहे. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या हॉटेल व उपाहारगृह चालविण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतला. सुरूवातीला त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कधी आर्थिक तर कधी कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी न डगमगता सामना केला व अल्पावधीतच त्यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ उपहारगृह' नावाप्रमाणेच सर्वांच्या मनात घर केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने उद्योजिका बनलेल्या महिलांना आर्थिक बळकटी मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ज्या नऊ महिलांनी उपहारगृह सुरू केला त्यात, लता विनोद राखडे (दवडीपार), सविता सुरेश गजभिये ( मुजबी), सुरेखा राजेश गजभिये (मुजबी), हिरा सुरेश निंबार्ते (बेला), जया हरिभाऊ मेहर (गणेशपूर), वर्षा कैलास कुंभरे (कोकनागड), जयश्री विनोद वंजारी (मौदी), नंदा नरेंद्र हुमने (सिल्ली) व अरूणा सुभाष चामट (डोंगरगाव) या 'नवदुर्गां'चा समावेश आहे. त्यांनी एकत्र येऊन अन्नपूर्णा महिला उत्पादक बचतगटाची निर्मिती केली.
या नवदुर्गांना एकत्रित आणल्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा तीन हजार रूपयाप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहे. या उपहारगृहात दोसा, ईडली, सांबारवडा, कटलेट, दहीवडा, साबुदाना वडा व खिचडी, पोहा, चहा, कॉफीसह जेवनही येथे मिळते. हेवेदावे न ठेवता, स्वत:चे कर्तव्य व जबाबदारी समजुन सर्व कामे गुण्यागोविंदाने करतात. या महिला उपहारगृहाच्या मालक असल्या तरी, त्याच कुकची भुमिकाही बजावतात. सर्व महिलांना कामांचे नियोजन करुन देण्यात आले आहे. त्यानुसार काही चहा, नास्ता देतात, काही साहित्य खरेदी करतात, काही महिला आॅर्डर घेतात तर काही पैशाचा व्यवहार सांभाळतात. पंधरा दिवसानंतर कामांची अदलाबदल करतात. पुरूषांच्या तुलनेत कुठेही कमी नसलेल्या या नवदुर्गांनी सुरू केलेल्या उपहारगृहाच्या माध्यमातुन सर्व खर्च वजा जाता प्रत्येक सदस्याला तीन हजार रूपये मिळतात. त्यांचे हे पाऊल समाजपरिवर्तनाची नांदी ठरणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.