कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षीही वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:17+5:302021-07-20T04:24:17+5:30

भंडारा : आषाढी वारी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांची पावले आपसुकच पंढरपूरच्या दिशेने पडतात. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी ...

For the second year in a row, Warakari left Ashadhi Wari of Pandharpur due to Corona | कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षीही वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला मुकले

कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षीही वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला मुकले

भंडारा : आषाढी वारी म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांची पावले आपसुकच पंढरपूरच्या दिशेने पडतात. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी वर्षभर चातकाप्रमाणे वाट पाहतात. भंडारा जिल्ह्यातूनही शेकडो वारकरी पंढरीला जातात. मात्र गतवर्षी पहिल्यांदाच कोरोनामुळे परंपरा खंडित झाली. यंदा तरी पंढरपूरला जाण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र शासन मोजक्याच पालखी, दिंड्या, निवडक ४०० वारकऱ्यांनाच पंढरीत प्रवेश देणार असल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांची निराशा झाली आहे.

पंढरपुरात संचारबंदी लागू केली असून, शहरात पोलीस बंदोबस्त केला आहे; मात्र राज्यातील लाखो वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन ऑनलाईन तरी घेता यावे म्हणून मंदिर संस्थानने ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. वारीची सर ऑनलाईन दर्शनाला येत नाही, अशी भावना वारकऱ्यांनी बोलून दाखविली. मंगळवारी आषाढी वारीचा सोहळा पंढरपुरात प्रतिकात्मक पद्धतीने निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक जिल्ह्यातील प्रत्येक वयोगटातील वारकरी आपल्या जिवाची पर्वा न करता सामील होतात. काही झाले, तरी आपल्याला आपल्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन होणार, हा आनंदच वारकऱ्यांना सुख देणारा असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे भंडारा जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या मनात हुरहूर आहे.

बॉक्स

डोळ्यांचे पारणे फेडणारा वाखरीचा रिंगण सोहळा

पंढरीची वारी म्हणजे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे. वारी ही अनेक वर्षांपासून चालत आलेली एक परंपरा आहे. राज्यातील वारकरी मंडळींनी वारीचा वसा अनेक पिढ्यांपासून चालवला आहे. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी अनेक वारकरी पायीच प्रस्थान करतात. वाखरीचा मुक्काम म्हणजे लाखो वारकऱ्यांसाठी जणूकाही महाकुंभमेळावाच असतो. वारकऱ्यांच्या उत्साहात हा वाखरीचा रिंगण सोहळा पार पडतो. हा रिंगण सोहळा वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

कोट

पांडुरंगाकडे आमची एकच मागणी आहे. कोरोनाचे संकट दूर होऊन पंढरपूरची वारी पुन्हा एकदा चालू होऊ दे. आषाढी वारीचा आनंद आम्हाला परत मिळू दे. जशी सासूरवाशीण सून आपल्या माहेरी येताच सुखाची शांत झोप येते, तीच अवस्था पंढरपूरला पोहोचताच वारकऱ्यांच्या मनाची होते. वारीचा आनंद आम्हा वारकऱ्यांना लवकरच अनुभवायला मिळू दे.

फटिंग महाराज, जवाहरनगर

Web Title: For the second year in a row, Warakari left Ashadhi Wari of Pandharpur due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.