दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रवाशांची संख्या आली ७५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:14+5:302021-04-25T04:35:14+5:30
तुमसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रवासाला प्रवाशांनी ब्रेक लावला आहे. तुमसर रोड रेल्वेस्थानकातून दर दिवशी तीन हजार प्रवासी ...

दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रवाशांची संख्या आली ७५ वर
तुमसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रवासाला प्रवाशांनी ब्रेक लावला आहे. तुमसर रोड रेल्वेस्थानकातून दर दिवशी तीन हजार प्रवासी प्रवास करीत होते. त्यांची संख्या आता केवळ ७५ वर आली आहे. रेल्वे स्थानकावर शुकशुकाट दिसत असून दर दिवशी रेल्वेच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे.
मुबंई हावडा मार्गावरील तुमसर रोड रेल्वे स्थानक महत्त्वाचे म्हणून ओळखले जाते. कोरोनापूर्वी येथून दररोज तीन हजार प्रवासी ये - जा करत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला दररोज ९० ते ९५ हजारांच्या महसूल प्राप्त होत होता. परंतु सध्या केवळ ७५ प्रवासी येथून प्रवास करीत असल्याची माहिती आहे. रेल्वे स्थानकातून दरदिवशी २० ते २५ हजारचे आरक्षण सध्या केले जात आहे. यापूर्वी सुमारे शंभर तिकिटांचे आरक्षण येथून केले जात होते.
पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे ६० ते ६५ हजाराचे दररोज रेल्वेचे आर्थिक नुकसान होत आहे. वर्षभरापासून तुमसर ते तिरोडी रेल्वे प्रवासी गाडी बंद आहे. त्याचाही फटका येथे बसत आहे. नागपूर विभागात महसुलात सध्या सहाव्या क्रमांकावर पोचले आहे. गुडस ट्रेनमध्ये या रेल्वे स्थानकाचा अव्वल क्रमांक लागतो हे विशेष. नागपूर विभागात सध्या महसूल उत्पन्नात गोंदिया, इतवारी, राजनांदगाव, डोंगरगड, भंडारा रोड व तुमसर रोड असा क्रम आहे.
बॉक्स
पाच अधिकारी आजारी
नियमित कर्तव्य रेल्वे कर्मचाऱ्यांना करावे लागते प्रवाशांची त्यांचा थेट संपर्क येतो. त्यामुळे येथील रेल्वेचे तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत तर दोन अधिकारी आजारी आहेत. त्यामुळे उर्वरित अधिकाऱ्यावर अतिरिक्त जबाबदारी आलेली आहे. रेल्वेकडे अतिरिक्त स्टॉप नसल्याने या अधिकाऱ्यांनाच कर्तव्य पार पाडावे लागत आहे.
आरक्षण रद्द करताना नव्हते रुपये
तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून एका प्रवाशाने लग्नानिमित्त काही तिकिटे आरक्षित केली होती. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे त्यांनी आरक्षण तिकिटे रद्द केली. परंतु त्यांना रद्द केलेला आरक्षणाचे पैसे स्थानिक रेल्वे बुकिंग विभागात नव्हते. त्यामुळे येथील रेल्वे बुकिंग विभागाने इतवारी (नागपूर) वरून ९५ हजार रुपये मागितले. सदर राशी आल्यानंतर आरक्षण रद्द केलेल्या व्यक्तीला देण्यात आली. आर्थिक टंचाईचा सामना येथे रेल्वे प्रशासनाला बसत आहे.
कोट
लॉकडाऊन काळात दररोज २० ते २५ हजारांचे तिकिटांचे आरक्षण होत आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे ७५ प्रवासी प्रवास करीत आहेत. पॅसेंजर गाड्या बंदचा परिणाम महसुलावर झाला असून सध्या प्रवासी संख्याही घटली आहे.
मोतीलाल, बुकिंग क्लर्क,
तुमसर रोड रेल्वे स्थानक