प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मागील सर्वसाधारण सभा ८ सप्टेंबर रोजी कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी व्हिडिओ काॅन्फन्सिंगद्वारे घेण्यात आली. नेटवर्क व अन्य तांत्रिक अडचणींमुळे १० नगरसेवक व १ स्वीकृत नगरसेवक यांनी त्यासभेत घेण्यात आलेल्या ठरावावर कार्यवृतात नोंदविण्यासाठी सभाध्यक्ष, मुख्याधिकारी व कार्यालयीन निरीक्षक यांना लेखी सादर केले. परंतु बहुमतात असूनही नगरसेवकांचे मत कार्यवृत्तात नोंदविण्यात आले नाही व सर्व ठराव सर्वसहमतीने मंजूर झाल्याचे नोंदविण्यात आले. ही बाब १५ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचे लक्षात आले. या संदर्भात सभाध्यक्षांना सर्व १० नगरसेवकांनी विचारणा केली असता सभाध्यक्ष किंवा मुख्याधिकारी यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. उलट एकाही विषयावर चर्चा न करता सभा बरखास्त केल्याचे घोषित करुन सभागृह सोडले. बहूमतातील नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना घेराव करुन मत का नोंदविले जात नाही अशी विचारणा केली पण त्यांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. शेवटी सदस्यांनी हुकूमशाही थांबवा, अशा घोषणा देत सभागृहातील खुर्च्यांची आदळ आपट करुन असंतोष व्यक्त केला. कोणत्याही सभेतून विरोधक वाॅकआऊट करतात हे लोकांना माहिती आहे. पण सत्तारूढ गटानेच सभेतून वाॅकआऊट केल्याने पवनी नगरात खमंग चर्चा सुरु आहे.
बहुमतात असलेल्या नगरसेकांचे मत विचारात न घेतल्याने हंगामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST