स्काऊट-गाईड्समधून मिळतात स्वालंबनाचे धडे
By Admin | Updated: September 1, 2015 00:30 IST2015-09-01T00:30:01+5:302015-09-01T00:30:01+5:30
स्काऊट व गाईड्स चळवळीच्या माध्यमातून समाजाची निस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळते.

स्काऊट-गाईड्समधून मिळतात स्वालंबनाचे धडे
रामचंद्र अवसरे यांचे आवाहन : सर्वच तालुक्यात उद्बोधन वर्ग
भंडारा : स्काऊट व गाईड्स चळवळीच्या माध्यमातून समाजाची निस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळते. स्वालंबनाचे धडे दिले जातात. स्काऊट गाईड ही चळवळ समाजाला उपयोगी आहे. त्यामुळे स्काऊट गाईड्स चळवळीत जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
पवनी लाखांदूर तालुक्यातील उद्बोधन वर्गाला भेट दिली असता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथील संत शिवराम उच्च प्राथमिक शाळा भंडारा, मोहाडी, तुमसर या तीन तालुक्याचे जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे लाखनी, साकोली या दोन तालुक्याचे विकास हायस्कूल पवनी, लाखांदूर या दोन तालुक्याचे स्काऊटस गाईडर उद्बोधन वर्ग जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
या उद्बोधन वर्गाचे उद्घाटन स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने करण्यात आले. संचालन चंद्रकांत भगत यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा चिटणीस माजी प्राचार्य श्रावण कळंबे यांनी केले.
यावेळी जिल्हा मुख्य आयुक्त दादाजी कोचे म्हणाले, स्काऊट गाईड अभ्यासक्रमामुळे बौद्धिक विकास व अनुशासित बनण्याकरिता स्काऊट गाईडचे शिक्षण महत्वाचे आहे. बाल्यावस्थेतील या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. समाजाची नि:स्वार्थ सेवा करण्याकरीता व स्वालंबनाची जाणीव होण्याकरिता स्काऊट गाईडचे प्रशिक्षण अवश्य घ्यावे असे आवाहन केले. पवनी लाखांदूर तालुक्यातील उद्बोधन वर्गाकरिता आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
या उद्बोधन वर्गात सर्वच तालुक्यातील ३६५ स्काऊटर गाईडर व पदाधिकारी सहभागी झाले होते. या उद्बोधन वर्गात प्रथम सोपान, तृतीय सोपान अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा उपस्थितीपट व प्रगतीपट कसा भरावा, स्काऊट गाईड शिक्षणाचे फायदे राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, उपराष्ट्रपती पुरस्कार, लक्ष्मी मुझुमदार पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा आणि वर्ष भरात राबवायचे उपक्रम स्काऊट गाईडचे ध्येय नियम, स्काऊट, गाईडचा, लक्ष्मी मुझुमदार पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा आणि वर्षभरात राबवयाचे उपक्रम स्काऊट गाईडचे ध्येय नियम, स्काऊट गाईडचा गणवेश, टाळ्या, जिल्हा मेळावा, राज्य मेळावा, राष्ट्रीय जांबोरी, आर्थिक तरतुद कशी करावी, खरी कमाई कशी करवी याबाबत माहिती देण्यात आली.
या उद्बोधन वर्गास डी.एफ. कोचे, श्रावण कळंबे, चंद्रकांत भगत, चेतना ब्राह्मणकर, गणेश सार्वे, रोहिणी रोकडे, शोभना ठाकूर, दिशा गद्रे, रेखा गिऱ्हेपुंजे यांनी मार्गदर्शन केले.
संत शिवराम उच्च प्राथमिक शाळा भंडारा येथे उद्बोधन वर्गाला गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, व्ही.एस. पडोळे, मुख्याध्यापक देवंचद चौधरी, कुंदा गोडबोले, जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथील उद्बोधन वर्गास आर.डब्ल्यू. मेश्राम यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)