शिक्षकांसाठी दुसऱ्या दिवशीही शाळा बंद

By Admin | Updated: February 10, 2016 00:33 IST2016-02-10T00:33:50+5:302016-02-10T00:33:50+5:30

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी शिक्षण विभागाने धुडकावून लावल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून शाळा बंद पाडली आहे.

School closes for teachers for the next day | शिक्षकांसाठी दुसऱ्या दिवशीही शाळा बंद

शिक्षकांसाठी दुसऱ्या दिवशीही शाळा बंद

खंडाळा येथील प्रकार : पालकांचा शाळेवर बहिष्कार
कुंभली : शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी शिक्षण विभागाने धुडकावून लावल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून शाळा बंद पाडली आहे. हा प्रकार खंडाळा येथे घडला असतानाही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
साकोली पंचायत समिती अंतर्गत कुंभली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नियमानुसार या शाळेला चार शिक्षकांची आवश्यकत आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार तीन शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
त्यातील चांदेवार व उईके नामक दोन शिक्षक वैद्यकीय रजेवर असल्याने मुख्याध्यापक यु.जी. भस्मे व जिल्हा निधीतून नुकतीच पदभरती केलेले एक कंत्राटी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
दोन नियमित शिक्षक रजेवर असल्याने व येत्या काही दिवसातच वार्षिक परीक्षा समोर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाला येथे शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी लावून धरली. मात्र या गंभीर विषयाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी जोपर्यंत शिक्षकाची भरती होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारला या निर्णयानुसार पाल्यांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे काल व आज दोन्ही दिवस पालकांनी शाळेवर बहिष्कार घातल्याने शिक्षकांखेरीज एकही विद्यार्थी शाळेकडे भटकला नाही. शिक्षण विभागाने शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी अन्यथा शाळेत विद्यार्थी जाणार नाही असा निर्णय पालकांनी घेतल्याने शिक्षण विभाग काय भूमिका घेते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोमवारला पालकांनी शाळा बंद पाडल्याची माहिती होताच संवर्ग विकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशे, गटशिक्षणाधिकारी बावनकुळे, पंचायत समिती उपसभापती लखन बर्वे, विस्तार अधिकारी पडोळे यांनी शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली. (वार्ताहर)

शिक्षकाच्या मागणीसाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शिक्षक प्राप्त होणे दूरच येथील शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या शाळेवर पाठविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-रवींद्र गाडेगोने, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
शाळेत शिक्षकांची रिक्त पदे आहेत. याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात आले आहे. पालकांच्या शाळेवरील बहिष्काराची माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली आहे.
-यु.जी. भस्मे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा, खंडाळा
शिक्षक भरती बंद आहे. अतिरिक्त शिक्षक नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार व शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फतीने अनिरुद्ध रामटेके यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे.
-सुधाकर बावनकुळे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी साकोली

 

Web Title: School closes for teachers for the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.