शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांनी बंद केली शाळा
By Admin | Updated: December 4, 2014 23:03 IST2014-12-04T23:03:06+5:302014-12-04T23:03:06+5:30
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन सत्रापासून एका शिक्षकांचे पद रिक्त होते. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालक संघाच्या मागणीनंतरही

शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांनी बंद केली शाळा
साकोली : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन सत्रापासून एका शिक्षकांचे पद रिक्त होते. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालक संघाच्या मागणीनंतरही शिक्षकाचे पद न भरल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना आज गुरुवारला शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे शाळा बंद राहिली. परिणामी शिक्षण विभागाने दुपारनंतर तात्पुरत्या शिक्षकाची नियुक्ती केली आहे.
बोंडे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एक ते चार वर्ग आहेत. यावर्षी पाचवा वर्ग सुरु करण्यात आला.
या शाळेत आता पहिली ते पाचवीची पटसंख्या ६८ असून या शाळेत एक मुख्याध्यापक व दोन सहाय्यक शिक्षकांची मंजुरी आहे. यावर्षी शिक्षण विभागाने पाचव्या वर्गाची मंजुरी दिली. मात्र शिक्षकच दिला नाही. त्यामुळे या शाळेत पाच वर्गासाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांनी दि. २४ आॅक्टोबरला गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन शिक्षकाची मागणी केली. शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली नाही तर दि.४ डिसेंबर रोजी शाळा बंद करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या निवेदनाची दखल घेतली नाही. परिणामी आज शाळा बंद आंदोलन करण्यात आले.
शाळा बंद आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल करणकोटे, उपाध्यक्ष राजेश मडावी, सदस्य अल्का गायधने, नेहा मेश्राम, मिना मेश्राम, अनिता गायधने, कल्पना गोंधळे, मंगला मडावी, रोमन गजबे, गरीब गोंधळे, बाबूराव वंजारी, विकास मेश्राम व पालकांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)