पवनीत गॅसचा तुटवडा
By Admin | Updated: August 21, 2014 23:38 IST2014-08-21T23:38:21+5:302014-08-21T23:38:21+5:30
तालुक्यात इंडेन गॅसची एजंसी आहे. या माध्यमातून सुमारे २० हजार गॅस धारकांना आठवड्याला एक हजार ५०० सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने

पवनीत गॅसचा तुटवडा
पवनी : तालुक्यात इंडेन गॅसची एजंसी आहे. या माध्यमातून सुमारे २० हजार गॅस धारकांना आठवड्याला एक हजार ५०० सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
पवनी शहरात गॅस वितरणाची एकमेव एजंसी आहे. या एजंसीला नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुका, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील साठगाव, कोल्हारी या गावातील ग्राहकांनाही सिलिंडर वितरीत करावे लागते. सुमारे २० हजार गॅसधारक या एजन्सीचे ग्राहक आहेत. दरदिवशी ६०० सिलिंडरची गरज असताना एजंसीमध्ये सिलिंडरचा तुटवडा असतो.
पवनी लगत उमरेड-कऱ्हांडला-पवनी हा अभयारण्य तयार झाल्यामुळे येथील जंगलात सरपण गोळा करण्याकरीता महिलांना प्रवेश बंदी घातली आहे. वनविभागाकडून विक्री करीता लाकडे उपलब्ध होत नसल्याने परिसरातील जनतेला स्वयंपाकाकरीता लहान-मोठ्या समारंभासाठी लाकडांची गरज भासते. मात्र वनविभागाच्या कायद्याच्या कचाट्यात सरपण गोळा करणे आता जोखमीचे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी गॅस एजंसीचे जोडणी घेतले आहे. मागील दिवसात अड्याळ येथे गॅस एजंसी देण्याऐवजी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही तेथील एजंसी सुरू झाली नाही. अड्याळ व पवनी परिसरात नव्याने एजंसी देवून ग्राहकांचा गॅस सिलिंडरचा तुटवडा बंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)