पाणी साठवा-गाव वाचवा अभियानापासून जिल्हा दूरच
By Admin | Updated: August 18, 2014 23:18 IST2014-08-18T23:18:59+5:302014-08-18T23:18:59+5:30
पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून

पाणी साठवा-गाव वाचवा अभियानापासून जिल्हा दूरच
भंडारा : पाणी साठवा - गाव वाचवा या अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. पात्र ग्रामपंचायतीचा शासनाकडून गौरवही केला जाणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचा थेंबनथेंब अडविण्याचे शासनाचे धोरण आहे. या अभियानाला चालना देण्यासाठी पाणी साठवा - गाव वाचवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जूनपासून सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत ग्रामस्तरावर राबवायचे आहे. मात्र हे अभियान राबविण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्यात याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून पाणी टंचाईवर मात करता येते आणि पर्यावरणाचा समतोल साधता येतो, या उद्देशाने पावसाचे पाणी अडविण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामविकास विभागाने पाणी साठवा - गाव वाचवा हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
भूजल पातळी सर्व्हेक्षण, परीक्षण महिन्यात करावे, परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद करणे, पाणी साठविण्यासाठी कामाचे नियोजन आणि अंदाजपत्रक तयार करणे, वॉटर अकाऊंट तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी तज्जांची मदत घेणे, शासकीय, निमशासकीय, खासगी, इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग उभारण्यासाठी प्रत्येक कुटूंबप्रमुख, बचतगटातील महिलांना प्रवृत्त करणे, पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जागोजागी उतारात चर खोदणे, नादुरूस्त तलाव विहिरी शेततळ्यांमधील गाळ काढून तसेच आवश्यक ती दुरूस्ती करून जलसंचय करणे, भुगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार ग्रामपंचयतीने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
गावपातळीवर कामे, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, खडकांचे पाणी, पाझर व पाणी साठविण्याची क्षमता आणि इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून नियोजन करणे, गावातील पाण्याची पातळी मोजणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निश्चित करून पाणी टंचाईसाठी झालेला खर्च पाहणे, पाणी टंचाई, दुष्काळामुळे कृषी उत्पादन, पशू व्यवसायात झालेली घट लक्षात घेणे, पाणी टंचाईने मानवी जीवनावर झालेला परिणाम, रोगराई, बालमृत्यूचे प्रमाण, कुपोषणाची माहिती यासह ग्रामपंचायत परिसरातील भुगर्भाचा अभ्यास करून पाणी साठविण्याचा आराखडा तयार करावयाचा आहे. (शहर प्रतिनिधी)