हुलकावणी दिलेल्या संधीला नशिबाची साथ, संतूलाल पाचगावचे सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST2021-02-16T04:35:54+5:302021-02-16T04:35:54+5:30
तथागत मेश्राम वरठी : तीन दशकांपासून संतुलाल राजकारणात सक्रिय. दोनदा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान. अनेकदा मोठ्या पदावर जाण्याची संधी. ...

हुलकावणी दिलेल्या संधीला नशिबाची साथ, संतूलाल पाचगावचे सरपंच
तथागत मेश्राम
वरठी : तीन दशकांपासून संतुलाल राजकारणात सक्रिय. दोनदा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान. अनेकदा मोठ्या पदावर जाण्याची संधी. मात्र परिस्थितीने त्यांना कायम दूर ठेवले. पात्रता असूनही ऐन वेळेवर नशीब साथ देत नव्हते. अशा परिस्थितीने हुलकावणी दिलेल्या संधीला नशिबाने साथ दिली आणि मोहाडी तालुक्यातील पाचगावच्या सरपंचपदी संतुलाल गजभिये विराजमान झाले.
संतुलाल म्हणजे हाडामासाचा सक्रिय कार्यकर्ता. खरा लोकनेता कसा असावा याचे जिवंत उदाहरण. निवृत्तीच्या काळात त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांच्या समस्यांची जाण. तरुण राजकारण्यालाही मागे पाडते. राजकारणाने आर्थिक सुबत्ता कमावता आली नसली तरी लोकांत असलेली प्रतिमा मात्र सबळ आहे. निवडणुका म्हणजे खर्च परंतु तीन दशकात संतुलाल यांना पैशाची गरज पडली नाही. संपूर्ण खर्च मतदारच भागवितात. दोनदा ते पंचायत समितीच्या रिंगणात होते. थोड्या मतांनी पराभव झाला. दोन दशकांपासून असलेली प्रस्थापितांची सत्ता उलटविण्यात संतुलाल यांची प्रतिमा उपयोगी आली. पाचगाव हे छोटेसे गाव, परंतु समस्या मोठ्या. या समस्या तालुक्याच्या ठिकाणी मांडणे, आक्रमक होऊन सोडविणे असा संतुलाल गजभिये यांचा नित्यनेम असतो. १५ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत संतुलाल निवडून आले. ९ सदस्य असलेल्या त्यांच्या गटाला तीन आणि दुसऱ्या विरोधी गटाला सहा असे संख्याबळ होते. आरक्षण सोडतीत सरपंचपदाची संधी मिळाली. अनुसूचित जातीसाठी राखीव एकमेव सदस्य होते. त्यामुळे परिस्थितीने पद नाकारले तरी नशिबाने मात्र त्यांना संधी दिली.
मोबाईल नसलेला सरपंच
मोबाईल आता सर्वांकडे उपलब्ध आहे. परंतु संतुलाल यांना परिस्थितीने साधा मोबाईल ठेवणे परवडत नाही. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून विना मोबाईल आहेत. मात्र मोबाईल नसला तरी कोणतेच काम अडत नाही. आता सरपंच झाल्यावर शेतीपूरक व्यवसाय, बेरोजगारांच्या हाताला काम, रेतीचोरीला आळा बसविणे आदी कामांना गती देण्याचा मनोदय त्यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केला. यावेळी नेरीचे सरपंच आनंद मलेवार, वरठीचे आनंद मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, योगेश हटवार, अतुल भोवते, संघा उके, थारनोद डाकरे, अरविंद येळणे, पाचगावच्या पूजा रोडे, गुंजन शहारे, सतीश गभणे, शैलेश रामटेके, रमेश गेडाम आदी उपस्थित होते.