तहसीलमधून पळविला रेतीभरला टिप्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:25 IST2019-05-16T00:25:03+5:302019-05-16T00:25:31+5:30
महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेला टिप्पर चालकाने संधी साधून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तहसीलमधून पळविला रेतीभरला टिप्पर
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेला टिप्पर चालकाने संधी साधून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
महसूल विभागाच्या भरारी पथकातील तलाठी वैभव ठाकरे यांनी मंगळवारी रोहा घाटावरील रेती तपासणी करताना टिप्पर (क्र. एमएच ३६ एए १३६२) विना परवाना वाहतूक करताना आढळून आला. टिप्पर चालक पवन कनोजे याला विचारपूस केली.
सदर टिप्पर पालोरा येथील महादेव बुरडे यांच्या मालकीचा असल्याचे पुढे आले. पंचनामा करून सकाळी ८ वाजता ट्रॅक्टर मोहाडी तहसीलच्या प्रांगणात जमा करण्यात आला. मात्र टिप्पर चालकाने कुणी नसल्याची संधी साधून मुख्य दाराचे कुलूप तोडून रेती भरलेला टिप्पर पळवून नेला. हा प्रकार काही वेळातच लक्षात आला. मुख्य द्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यावरुन मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी टिप्पर मालक महादेव बुरडे (५२) रा.पालोरा व चालक पवन कनोजे रा.नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
२५ लाखांचा मुद्देमाल
जप्त केलेल्या टिप्परमध्ये पाच ब्रास रेती किंमत ५२ हजार आणि टिप्परची किंमत २५ लाख असा २५ लाख ५२ हजार रुपयांचा हा मुद्देमाल पळवून नेण्यात आला. रेती तस्करांची हिंमत वाढल्याचे या घटनेवरून दिसून येते. यामध्ये कोणाचा वरदहस्त आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे.