नाल्यातील रेती व खडकाचे खनन जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:02 IST2018-01-31T23:01:58+5:302018-01-31T23:02:32+5:30
जेवनाळा नाल्यातील गौण खनिजात रेती व खडकाचे विनापरवाना अवैधपणे खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

नाल्यातील रेती व खडकाचे खनन जोमात
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : जेवनाळा नाल्यातील गौण खनिजात रेती व खडकाचे विनापरवाना अवैधपणे खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. करिता याला वेळीच पायबंद घालावा. अशी मागणी उपसरपंच धर्मपाल लांबकाने यांनी जिल्हाधिकारी व लाखनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
या अवैध खननाला तलाठी देशमुख हे जबाबदार असून त्यांचा या खनन करणाऱ्यांना पाठिंबा असल्याचा आरोप निवेदकर्त्यांनी निवेदनातून केला आहे. परिसरातील धनधांडग्यांनी महसूल प्रशासनाचे सर्व नियम बाजूला सारून खनीज संपत्तीचे खनन केल्याचे चित्र आता दिसत आहे.
यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून महसूल प्रशासनाचा लाखोंचा महसूल यामुळे बुडत आहे. पर्यायाने प्रशासनाला फटका बसत असतानाही अधिकारी गप्प आहेत.
मंडळ अधिकारी व तलाठी यांना सुचना देऊन चौकशीचे आदेश देण्यात येईल. यात कुणाचीही गय करण्यात येणार नाही.
- शरद घारगडे, नायब तहसीलदार लाखनी
घटनास्थळावर जाऊन चौकशी करण्यात येईल. खर-खोट्याची शाहनिशा करुन अवैध खनाला पायबंद घालण्यात येईल.
- टिकेश्वर गिऱ्हेपुंजे, मंडळ अधिकारी
जेवनाळा नाल्यातील अवैध रेती व खडक खननाबाबत एकही तक्रार शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला केली नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबदसुद्धा तलाठी कार्यालयाला तक्रार नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी जाउन चौकशी करू.
- आर. टी. देशमुख तलाठी गुरढा/ जेवनाळा.