हजारोंची उपस्थिती : समता सैनिक दलाचा उपक्रमभंडारा : भीमा कोरेगाव शौर्य विजय स्तंभाला समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दल यांच्यातर्फे शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. याचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे आणि महासचिव एम. आर. राऊत यांनी केले. मिरवणूक त्रिमुर्ती चौकात पोहचताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभा घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी उरकुडे, थोरवे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी समता सैनिक दलातर्फे राष्ट्रीय प्रचारक भदंत नागदिपंकर, दादासाहेब कोचे, एम.जे. राऊत, गजेंद्र गजभिये, बोधानंद गुरूजी यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.दादासाहेब कोचे म्हणाले, १ जानेवारी १८१८ साली कॅप्टन स्टाटन या इंग्रजाच्या नेतृत्वाखाली सिद्धनाथ यांचे ५०० महार सुर सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोडदौड आणि आठ हजार पायदळ सैनिकांना निकराची झुंज दिली. भिमा नदीच्या काठावर असलेल्या कोरेगाव यास्थळी हे युद्ध झाले. पेशव्यांच्या रक्तदाने भीमा नदीचे पाणी रक्तबंबाट झाले, असे इतिहासकारानी नमूद केले आहे. त्याच स्थळी भीमा कोरेगाव येथे ३२ चौरस फूट चबुतऱ्यावर ६५ फुट उंच विजय स्तंभ उभारलेला आहे. यावर सिद्धनाग, रतननाग यासारखे २३ शुरविरांची नावे कोरली आहे. सरसेनानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दरवर्षी १ जानेवारीला उपस्थित राहून वीर शिपायांना मानाचा मुजरा देत होते. याची जाणीव ठेवून समता सैनिक दलाच्यावतीने भंडारा येथे मिरवणूक आणि मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात चांदोरी, दवडीपार (बाजार), आंबाडी, सिल्ली, भोजापूर, पारडी, आंधळगाव, नवेगाव, चुल्हाड, सालेबर्डी, साकोली, बोदरा, जांभळी, खंडाळा, सानगडी, कोकनागड, आमगाव, दिघोरी, धारगाव, उमरी, गोंदिया, कन्हान, नागपूर येथील शाखांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी संजय घोडके, सी.टी. मेश्राम, सुरेश मेश्राम, प्राचार्य अर्जुन रामटेके, श्रीराम बारकर, नरेंद्र भोयर, प्रवीण मेश्राम, हितेंद्र नागदेवे, एस.एस. हुमणे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
शहिदांच्या विजयस्तंभाला मानवंदना
By admin | Updated: January 8, 2016 00:50 IST