मध्यप्रदेशातील आयात धानाची तुमसर तालुक्यात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST2020-12-02T05:00:00+5:302020-12-02T05:00:18+5:30
मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्या प्रतीच्या धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवून विक्री करणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात येत असणारा धान हा ट्रकने आणला जातो. एका विशिष्ट ठिकाणी हा धान गोळा केला जातो.

मध्यप्रदेशातील आयात धानाची तुमसर तालुक्यात विक्री
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील काही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातील धान विक्री केल्या जात असल्याची खळबळजनक माहिती आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारावर ही विक्री होत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान गत आठ दिवसापासून खरेदी केंद्रावर पडून आहे.
तुमसर तालुका धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. शासनाने यावर्षी तुमसर तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांना बोनस देण्याचीही घोषणाही केली. तुमसर तालुका मध्य प्रदेशाच्या सीमेचर आहे. मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातील धान मोठ्या प्रमाणात तुमसर तालुक्यात येणे सुरू झाले आहे. येथील येथील शेतकऱ्यांच्या सातबारावर हा धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्या प्रतीच्या धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवून विक्री करणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात येत असणारा धान हा ट्रकने आणला जातो. एका विशिष्ट ठिकाणी हा धान गोळा केला जातो. तेथून बारदान्यात भरून ट्रॅक्टरने संबंधित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर तो नेण्यात येतो. त्यांच्याजवळ सदर धानाचा सातबारा असते त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र संचालक त्यांचे धान सहज घेतात. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातील धान व तुमसर तालुक्यातील धान यांच्यात कमालीचे अंतर आहे. त्यामुळे मध्यप्रदेशतील धान कोणते आहे हे सहज ओळखता येते. परंतु या धानाची ओळख करण्यास कुणालाच वेळ नाही. मध्यप्रदेशात सर्वसाधारण धानाला भाव कमी असल्याने अनेक व्यापारी तेथुन धान खरेदी करुन भंडारा जिल्ह्यातील सीमावर्ती आधारभुत केंद्रावर विकत असल्याची माहिती आहे. याची चौकशी करणे गरजेचे आहे.
सातबारा जमा करणारी टोळी सक्रिय
तुमसर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले धान व्यापाऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचा सातबारा त्यांच्याकडे आहे. हा सातबारा जमा करण्यात येतो. त्या मोबदल्यात त्यांना काही रक्कम देण्यात येतो. त्यामुळे सदर लहान शेतकरी आपला सातबारा या टोळीला देतात अशी माहिती आहे. सदर प्रकरणात पणन कार्यालय अनभिज्ञ असल्याचे समजते. मागील अनेक महिन्यापासून येथे असाच प्रकार सुरू आहे. परंतु अजूनपर्यंत कुठेही चौकशी आणि कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.
त्या शेतकऱ्यांनी विकले व्यापाऱ्यांना धान
मध्यप्रदेशातील धान विक्री करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा सातबारा घेण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांनी आपले धान यापूर्वीच व्यापाऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे त्यांच्या सातबारावर नियमात बसवून मध्यप्रदेशातील धान येथे सहज विक्री केला जात आहे. धान विक्री करण्याचे येथे रॅकेट सक्रीय असल्याची माहिती आहे.
मध्यप्रदेशातील धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली जात नाही. यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.
- गणेश खर्चे,
जिल्हा पणन अधिकारी भंडारा.
तुमसर तालुक्यातील सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातील धान मोठ्या प्रमाणात येत असून त्यांची येथील सातबारावर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे. संबंधित विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी.
- शंकर राऊत,
अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस कमिटी.