सीमावर्ती भागातील सागवन जंगल भुईसपाट
By Admin | Updated: November 10, 2014 22:37 IST2014-11-10T22:37:28+5:302014-11-10T22:37:28+5:30
लाखांदूर-अर्जुनी (मोरगाव) सीमेवरील घनदाट जंगलातून सागवान लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. पिंपळगाव (कोहळी) व धाबेटेकडी या भागातील सागवन जंगल भुईसपाट झाल्याचे उघडकीस आले आहे.

सीमावर्ती भागातील सागवन जंगल भुईसपाट
अधिकारी-तस्करांचे साटेलोटे : लाखांदूरमार्गे नागपुरात सागवान तस्करी
लाखांदूर : लाखांदूर-अर्जुनी (मोरगाव) सीमेवरील घनदाट जंगलातून सागवान लाकडांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. पिंपळगाव (कोहळी) व धाबेटेकडी या भागातील सागवन जंगल भुईसपाट झाल्याचे उघडकीस आले आहे. वनअधिकारी आणि सागवन तस्करांमुळे हे जंगल आता ओसाड पडू लागले आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर गोंदिया वनविभागाची पुनर्रचना करताना झालेल्या चुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सुमारे २,७३७.३० हेक्टर वनक्षेत्र अजूनही गोंदिया वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात आहे. दोन्ही जिल्ह्याच्या सिमारेषेत असलेले पिंपळगाव को व धाबेटेकडी येथील वनक्षेत्रात सागवन जंगल मोठ्या प्रमाणात आहे. १ मे १९९९ ला जिल्हा विभाजनानंतर वनक्षेत्राचेही विभाजन होवून सागवन वनक्षेत्र गोंदिया जिल्ह्यात गेले. याचाच फायदा घेत तेथील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वनतस्करांनी संगनमत करुन वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू केली.
वनपरिक्षेत्र कार्यालयापासून जंगल दूर अंतरावर आहे. जंगलाला लागून असलेले गोंदिया जिल्ह्यातील कोरंभी, धाबेटेकडी, बोडध, बोरी, झरपडा, ताडगाव तर लाखांदूर तालुक्यातील पुयार, पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव, चिचगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सागवन झाडांचे खसरे तयार करून धाबेटेकडी येथील वनविभागाचे अधिकारी झाडे कापण्याची परवानगी देतात. याच खसऱ्यांमध्ये जंगलातील सुकलेले सागवानची लाकडे एकत्र करून शिताफीने विकले जातात. यासाठी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. नागपूर येथील बाजारात धाबेटेकडी जंगलातील सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच लोकमतने ‘स्टिंग आपरेशन’ करुन पिंपळगाव (को) व धाबेटेकडी सीमेलगतचे सागवन जंगल पिंजून काढले असता धक्कादायक बाब उघडकीस आली. अर्जुनी (मोरगाव) रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलात आत ४ ते ५ कि़मी. फिरून पाहाणी केली असता. शंभराहून अधिक सागवान झाडांना तोडून लाकडे जमा करुन ठेवल्याचे दिसून आले. शेकडो झाडे अर्धवट कापलेल्या स्थितीत आढळून आले तर मोजण्या पलिकडे झाडांची कत्तल करुन ठेवली आहे.
मागील सहा वर्षाच्या काळात हजारांहून अधिक सागवान झाडांची कत्तल करून तस्करी करण्यात आल्याचे दिसून आले. वनतस्कर व वन अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण मैत्रीमुळे हा प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. या जंगलातील तोडलेली लाकडे लाखांदूरमार्गे नागपूरला विकण्यात येत असल्याचे एका वनकर्मचाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर बोलताना सांािगतले. (तालुका प्रतिनिधी)