संकटग्रस्त शेतकऱ्यांवर ‘साडेसाती’ सुरूच
By Admin | Updated: April 10, 2015 00:42 IST2015-04-10T00:42:00+5:302015-04-10T00:42:00+5:30
यावर्षी खरीप हंगामापासून तर रब्बी हंगामापर्यंत शेतकरी संकटावर संकट सोसत आलेला आहे.

संकटग्रस्त शेतकऱ्यांवर ‘साडेसाती’ सुरूच
भंडारा : यावर्षी खरीप हंगामापासून तर रब्बी हंगामापर्यंत शेतकरी संकटावर संकट सोसत आलेला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांवर 'साडे साती'चे सावट भेडसावत असून संकटातून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा आहे.
खरीप हंगामातील धानपिकाचे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झाले. कसेबसे उत्पन्न झाले. त्याचे आधारभूत किंमत मिळाले नाही. खर्च वजा केले असता केवळ माती शिल्लक राहिली, हे पहिले संकट. हिम्मत न हारता रब्बी पिकाची पेरणी केली. गहू, हरभरा, लाखोरी, वाटाणा, मसूर, उळीद आदी उभ्या पिकावर महाशिवरात्रीच्या पर्वावर अवकाळी गारपिटीसह पावसाने उभ्या पिकाची राख रांगोळी केली, हे दुसरे संकट.
शेतातील उभे असलेल्या पिकावर फुल व फळ धारणा होईल या आशेने दुकानातील उसनवार, औषधी व खते घेवून फवारणी केली. कसे बसे हातात येणारे उत्पन्न तेही निसर्गाला मान्य झाले नाही. पुन्हा २९ मार्चच्या सायंकाळी वादळ व अवकाळी पावसासह निसर्ग कोपला, सर्व पिक नष्ट करून गेला. फळबाग, वांगी, कांदा, कारले, भोपळा, पालेभाज्या, टमाटर आदी पिकांचे महागडे बियाणे घेवून लागवट केलेले सर्व पिक जमिनदोस्त झाले, हे तीसरे संकट. खरीप हंगामात राष्ट्रीय बँक, सहकारी बँक यामधून पिक कर्ज काढले.
एवढ्यावरच भागविले नाही कारण महागडे बियाणे औषधी, खते, मशागत व मजुरीतच पूर्ण कर्ज गेले. म्हणून सावकारकडून ऊसणवार घेतलेले वेगळे कर्ज डोक्यावर घेवून या पिकात नाही तर पुढच्या पिकात परतफेड करता येईल, या आशेने जगता जगता कर्जांचा डोंगर वाढला आहे. आता मात्र परतफेड करायची कसी, हे चवथे संकट आहे.
मार्चअखेर राष्ट्रीय बँक, सहकारी बँक, सावकार, उसनवारीचे पैसे, मागणीचा तगादा शेतकऱ्यांवर येत आहे. राष्ट्रीय व सहकारी बँक व्याजासह पैसे भरा अन्यथा कारवाई होईल, असा धाक देत आहेत. पूर्वी व्याजासह चालू पिक कर्ज भरा नंतर शासन व्याजमुक्त करेल तेव्हा भरलेला व्याज तुमच्या खात्यात जमा होईल, असा बळजबरीने शेतकऱ्यांना धमकावित आहे.
खरीप हंगामात दुष्काळनिधी केंद्र व राज्य शासनाने हेक्टरी सात हजार ५०० रूपये जाहिर केली होती ती अजुनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. पीक कर्ज भरायचे कसे व कर्ज मुक्त होणार कधी हे नेहमीचे पाचवे संकट.
संकटावर संकट झेलणारा शेतकऱ्यांचा खरा वाली कोण, असा सवाल जिल्हा भारत कृषक समाज भंडारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नैसर्गीक आपत्तीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. परंतु जिल्हा प्रशासन व राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने सन्मानित भारत कृषक समाज जिल्हा शाखातर्फे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, खरीप हंगामातील दुष्काळनिधी हेक्टरी सात हजार ५०० रूपये त्वरीत जमा करावी, चालू वर्षातील पिक कर्ज भरण्याची मुदत आॅगस्ट २०१५ पर्यंत वाढवून नवीन पीक कर्ज बिनव्याजी ताबडतोब द्यावी, बँकेकडून घेतलेले पीक कर्ज भरण्याविषयीचे कठोर धोरण रद्द करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा भारत कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष अविनाश चौधरी, प्रगतशील शेतकरी नाना पंचबुद्धे, कृषी भूषण रामभाऊ कडव, श्रीराम येळणे, देश मिरासे, देवानंद चौधरी, प्रभू फेंडर, अरुण बोरकर यांनी दिला आहे.
(नगर प्रतिनिधी)