ग्रामीण एटीएम झाले कॅशलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:57 IST2018-11-10T21:56:47+5:302018-11-10T21:57:11+5:30
दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.

ग्रामीण एटीएम झाले कॅशलेस
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.
शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातील जनताही एटीएमचा वापर करू लागले आहे. गावागावात विविध बँकांनी आपले एटीएम सुरू केले आहे. बँकेच्या रांगेतून सुटका मिळत असल्याने तात्काळ पैसे काढण्यासाठी एटीएमचाच पर्याय ग्रामीण जनताही निवडत आहे. आता जणू एटीएमवरून पैसे काढण्याची सवयच झाली आहे. मात्र दिवाळीच्या सणात ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट झाला आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नो कॅशचा फलक पाहून परत यावे लागते. दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. या काळात प्रत्येजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करता. त्यासाठी सोबत पैसा असावा म्हणून एटीएमवरून पैसे काढले जातात. परंतु गत आठ दिवसांपासून ग्रामीण भागातील एटीएममध्ये ठणठणाट झाला आहे. अनेकजण तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी येवून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्या ठिकाणीही त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुका मुख्यालयासह मोठ्या गावातील अनेक एटीएम गत आठ दिवसांपासून बंद आहेत. दिवाळीसारख्या सणात पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे रोख पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. बँका बंद असल्याने बँकेतूनही पैसे काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना बाहेरगावी जाण्याचे नियोजन बदलवावे लागत आहे. आता सोमवारी बँका सुरू होतील. तेव्हाच नागरिकांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी बँकात मोठी गर्दी उसळणार आहे.
लिंक फेलचाही फटका
काही गावातील एटीएममध्ये पैसे असले तरी लिंक फेलचाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक एटीएम शटरबंद दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक याठिकाणी जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु लिंक फेलचा मॅसेज वाचून मनस्ताप सहन करतात. यासर्व प्रकाराने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.