ग्रामीण भागात डॉक्टराच्या दारातच रुग्णाची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:54+5:302021-04-25T04:34:54+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : शहरातील रुग्णालयात बेड प्राप्त होत नसल्याने उपचारासाठी रुग्ण ग्रामीण भागातील डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. ...

ग्रामीण भागात डॉक्टराच्या दारातच रुग्णाची झुंबड
चुल्हाड ( सिहोरा ) : शहरातील रुग्णालयात बेड प्राप्त होत नसल्याने उपचारासाठी रुग्ण ग्रामीण भागातील डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. गावात सुविधा नसतानाही डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याने, रुग्णांचे आत्मविश्वास वाढविण्यास मदतीचे ठरत असल्याचा बाका प्रसंग सिहोरा परिसरात निदर्शनास येत आहे. दरम्यान, रुग्णाचे मनापासून कोरोना विषाणू संसर्ग विषयी भीती काढण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात आरोग्यावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांवर बोगस असल्याचा नेहमी ठपका ठेवण्यात येत आहे. काही डॉक्टर यात अपवाद असले, तरी बहुतांश डॉक्टरांनी बेधडक कोरोना संसर्गच्या कालावधीत ग्रामीण भागात औषधोपचार करण्यास पुढाकार घेतला आहे. शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत, रुग्णाला बेड मिळत नसल्याने त्यांची हिम्मत अशीच खचून जात आहे. साधे औषध मिळत नाही, डॉक्टर तपासणी करीत नसल्याने रुग्ण खचून जात आहेत. ग्रामीण भागात आजारी रुग्णात कोरोना विषाणू संसर्गाची भीती असल्याने डॉक्टरच्या शोधात रुग्ण गावोगावी हिंडत आहेत. ग्रामीण भागात डॉक्टराचा अभाव असल्याने रुग्णाना उपचार मिळत नाहीत. दरम्यान, सिहोरा परिसरात आरोग्य उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्र, आंग्ल दवाखाना आहे. खासगी दवाखाने आहेत, परंतु कोरोना संसर्ग असल्याची पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याची भीती रुग्णात असल्याने तपासणीकरिता रुग्ण जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे दिसतात. कोरोनाचा आजार असल्याची भीती रुग्णांत असल्याने, गावात असणाऱ्या खासगी डॉक्टरचा शोध उपचारासाठी घेतला जात आहे. वातावरणात बदल झाल्याने अनेक संसर्ग आजार बळावले आहेत.
या आजारावर उपचार करण्यासाठी गावात डॉक्टर मिळत नसल्याने गावातील वातावरण ढवळून निघत आहे. आजाराचा संसर्ग असल्याने अनेक डॉक्टर आजारी असल्याने त्यांनी दवाखान्यात उपचार पद्धत बंद केली आहे. अनेकांच्या क्लिनिकला टाळे लागले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात बोगस डॉक्टरचा ठपका असणारे डॉक्टर रुग्णाचे मदतीला धावून येत असल्याचा बाका प्रसंग सिहोरा परिसरातील गावात निदर्शनास येत आहे. गावातच त्यांनी बेधडक रुग्णावर उपचार करण्यास सुरुवात केल्याने रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
कोरोना संसर्ग विषाणूविषयी जनजागृतीचे मार्गदर्शन करीत असल्याने, रुग्णाचे मनातून भीती काढण्याचे मोलाचे कार्य गावात डॉक्टर करीत आहेत. गावात रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या रामबाण सुविधा नाहीत. यामुळे त्यांनी घरीच क्लिनिक थाटले आहेत. रुग्णांना सलाइन लावण्याची उपाययोजना त्यांनी केल्याने रुग्णाचे आत्मविश्वास वाढविण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहेत. गावात औषधोपचाराची सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांमध्ये आत्मविश्वास जागविल्याची चर्चा परिसरात आहेत. गावात शहरातील रुग्ण उपचारासाठी धाव घेत असल्याने, सकाळपासून गर्दी दिसून येत आहेत. गावात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी उपचार करताना गरीब रुग्णाकडे पैसे नसल्यास मोफत औषधोपचार दिल्याचे उदाहरण गावात दिसून येत आहे. सिहोरा परिसरात गावातील डॉक्टरांनी रुग्णांच्या मदतीला धावून जाण्याचे निर्णय घेतल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
बॉक्स
कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे काय रे भावा?
सिहोरा परिसरातील एका गावात २० ते २५ नागरिकांचे कोरोना संसर्ग विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. राजकीय मातब्बरांच्या गावात एकाच वेळी २५ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आल्याने हाहाकार माजला आहे. गावात विना औषधोपचाराने त्यांना घरीच क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. औषध नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साधी भेट नाही. गावात त्यांची घरे सील नाही. गावकरी त्यांचे घराकडे संशयित नजरेने पाहत आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साध्या गोळ्या देण्यात आलेल्या नाहीत. कोरोना संसर्ग घरीच बरा होत असेल, तर शहरातील दवाखान्यात रुग्णाची गर्दी, नवीन दवाखान्याची निर्मिती कशासाठी आहे, असे अनेक सवाल या गावातील नागरिक करीत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे काय रे भावा, असे अनेक प्रश्न गावातील भोळे लोक करीत आहेत. गावात घरच्या घरी क्वारंटाइन झाले आहेत.