धावपळीत ‘फाईल’ तयार
By Admin | Updated: April 30, 2017 00:25 IST2017-04-30T00:25:10+5:302017-04-30T00:25:10+5:30
अंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ११७ शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या आहे. यात आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे.

धावपळीत ‘फाईल’ तयार
प्रकरण शिक्षकांच्या बदलीचे : अनियमितता झाली नसल्याची सावरासावर
प्रशांत देसाई भंडारा
अंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ११७ शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या आहे. यात आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे. या बदल्या नियमानुसार झाल्याचा अहवाल आयुक्ताकडे सादर करण्याच्या दृष्टीने जि. प. प्रशासनाने प्रयत्न चालविले आहे. दरम्यान या बदल्या रद्द करु नये, अशा आशयाची फाईल शनिवारी सायंकाळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिर यांच्याकडे सादर केल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.
विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या अनुशंगाने चौकशी समिती नेमली होती. या समितीला बदली प्रकरणात अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी २१ एप्रिलला आदेश काढून ११७ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने बदल्या रद्द केल्याचे आदेश जिल्हा परिषद भंडाराला बजावले.
आदेशानुसार जि. प. प्रशासनात खळबळ उडाली. यानंतर येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण अंगलट येऊ नये व रद्द झालेल्या बदल्या पूर्ववत रहाव्या यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव तंत्राचा वापर सुरु आहे. दरम्यान या बदल्यामध्ये अनियमितता झाली नसून सर्व नियमानुसारच असल्याचे जि.प. प्रशासनाकडून सांगण्यासाठी सावरासावर सुरु केली आहे.
आयुक्तांनी ३० एप्रिलपर्यंत जि. प. ला अहवाल मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. एकमेकांवर ताशेरे ओढणारे अधिकारी व पदाधिकारी यांनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न सुरु केले आहे. शनिवारी दिवसभर शिक्षण विभागात शिक्षकांच्या बदली प्रकरणातील फाईल्स या टेबलवरुन त्या टेबलवर तेथून शिक्षणाधिकारी देशपांडे यांच्या टेबलवर असा दिवसभर धावपळीचा प्रवास सुरु होता.
शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल
सायंकाळच्या सुमारास शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी बदली प्रकरण नियमानुसार झाली असून ती प्रक्रिया थांबवावी असा अहवाल तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्याकडे त्या आशयाची फाईल ठेवल्याचे समजते. याबाबत शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या भ्रमणध्वनीवर सांयकाळी ६.४३, ६.४३, ६.४४, ६.४५, ६.४८ वाजता संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.