जाहिरातबाजी उठली झाडांच्या जीवावर
By Admin | Updated: June 5, 2014 23:48 IST2014-06-05T23:48:14+5:302014-06-05T23:48:14+5:30
शहरातील झाडांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक अलीकडे धोक्याचे ठरू लागले आहेत. सदर फलकांमुळे झाडांवर इजा होवून झाडे कमकुवत होवू लागली आहेत.

जाहिरातबाजी उठली झाडांच्या जीवावर
वृक्षप्रेमींमध्ये संताप : वृक्षवेलींचे घटतेय आयुष्य, नगरपालिका, वन व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
भंडारा : शहरातील झाडांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक अलीकडे धोक्याचे ठरू लागले आहेत. सदर फलकांमुळे झाडांवर इजा होवून झाडे कमकुवत होवू लागली आहेत. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून त्यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे झाडे लावा झाडे जगवा या ब्रिदातून शासन पर्यावरण रक्षणाचा संदेश देते. झाडे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठी काही विभागांवर जबाबदार्या टाकण्यात आल्या आहेत. त्यासाठी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकीकडे वृक्षप्रेमी वृक्ष संवर्धनासाठी झटतात. दुसरीकडे काही महानुभव केवळ आपल्या जाहिरातबाजीसाठी लावलेल्या झाडांना इजा पोहचविण्यात मागे पुढे पाहत नाहीत. शहरातील अनेक झाडांवर बिनदिक्कतपणे खिळ्यांनी जाहिरातींचे फलक ठोकलेले आहेत. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून त्याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
शहरात फिरताना वृक्षांचे होत असलेले हाल ठिकठिकाणी बघायला मिळतात. वनकायदा एवढा सक्षम असतानाही त्याचे पालन अजिबात होताना दिसत नाही. गावाबाहेरच्या रस्त्यालगतचे एकही झाड असे नाही ज्यावर जाहिरातीचा फलक लागलेला नसेल. वन विभागातील अधिकार्यांच्या दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती भंडारा ग्रामीण मार्गावर झाडांच्या अवस्थेवरून दिसून येते. वन विभाग कार्यालयासमोर आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर चक्क खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)
राजकीय बॅनर, होर्डींग आघाडीवर
कुठल्याही राजकारण्यांचा वाढदिवस असो, एखाद्याची एखाद्या पदावर नियुक्ती अथवा निवड झालेली असो, शहरातील सर्वच चौकातील झाडांवर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाहिरातीचे फलक लावण्यात येतात. केवळ राजकीय बडेजावसाठी वृक्षांची हानी केल्या जात असल्याचे दिसून येते. शहरातील मुख्य रस्ता, राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर बॅनर, होर्डिंेग्ज व जाहिरातींचे फलक दिसून येतात.