६ कोटीकरिता २४ कोटींचा निधी थकीत
By Admin | Updated: September 10, 2014 23:25 IST2014-09-10T23:25:30+5:302014-09-10T23:25:30+5:30
बावनथडी प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाने सहा कोटींचा निधी न दिल्याने राज्य शासनाचा २४ कोटींचा निधी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या

६ कोटीकरिता २४ कोटींचा निधी थकीत
बावनथडीसाठी मुंबईत बैठक : एआयबीपी समावेशामुळे केंद्राची निधी मिळणे गरजेचे
तुमसर : बावनथडी प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाने सहा कोटींचा निधी न दिल्याने राज्य शासनाचा २४ कोटींचा निधी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याची माहिती आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या एआयबीपी अंतर्गत येत असल्याने केंद्र शासन येथे २५ टक्के निधी देते.
सन २०१३ मध्ये देशात व राज्यात गारपीट व इतर नैसर्गीक आपत्तीमुळे या प्रकल्पाला २५ टक्के निधी मिळाला नव्हता त्यामुळे मागील वर्षी राज्य शासनाचाही निधी प्राप्त झाला नाही. जलसंपदा विभागाच्या सचिवांनी विदर्भ पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी दि.९ रोजी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या कामाची सविस्तर माहिती, त्रृट्या, रखडलेली कामे, पुनर्वसन पॅकेज यासंदर्भात चर्चा झाली. यावर्षी पुन्हा केंद्र सरकारकडे २५ टक्के रकमेची मागणी करण्यात आली. केंद्र शासनाला येथे २५ टक्के रक्कम म्हणजे सहा कोटी देणे आहे. त्यानंतर राज्य सरकार २४ कोटींचा निधी मंजूर करेल, अशी माहिती आहे. बावनथडी प्रकल्प केंद्राच्या एआयबीपी योजनेत समाविष्ट असल्याने प्रथम केंद्र शासनाला २५ टक्के निधी द्यावा लागतो. प्रकल्प पूर्णत्वास ७० ते ८० कोटी निधीची गरज असून संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास एक ते दीड वर्षे पुन्हा लागतील. मंगळवारी मुंबई मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ सचिव व अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम उपस्थित होते. गेडाम यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. (तालुका प्रतिनिधी)