राज्यमार्गांना खिंडार
By Admin | Updated: July 27, 2014 23:35 IST2014-07-27T23:35:59+5:302014-07-27T23:35:59+5:30
राज्याचा विकास होण्यासाठी तेथील रस्त्यांचा मोलाचा वाटा असतो. विशेषकरुन राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग या दोन रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र जिल्ह्यांतर्गत व दुसऱ्या जिल्ह्यांना

राज्यमार्गांना खिंडार
भंडारा : राज्याचा विकास होण्यासाठी तेथील रस्त्यांचा मोलाचा वाटा असतो. विशेषकरुन राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग या दोन रस्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र जिल्ह्यांतर्गत व दुसऱ्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्यमार्गाची पावसाळ्यात दुरवस्था पहायला मिळते. क्षमतेपेक्षा जास्त दाब, कामाचा निकृष्ट दर्जा व वाढता भ्रष्टाचार यामुळे राज्य मार्गाच्या प्रतिमेत दिवसेंगणिक घट होत आहे.
भंडारा जिल्ह्यात राज्यमार्गांच्या संख्या अधिक आहे. भंडारा-पवनी, भंडारा-तुमसर, तुमसर-साकोली, भंडारा-रामटेक, साकोली-लाखांदूर, भंडारा-तुमसर-गोंंदिया आदी राज्यमार्गांचा समावेश आहे. पावसाळ्याला एक महिन्याचा कालावधी लोटला असताना या राज्य मार्गांची क्वालीटी सर्वांसमोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पाडणारा हा प्रकार सर्वांसमक्ष नेहमीच येतो. पावसाळा दरवर्षी येतो हे त्रिकाल सत्य असले तरी रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेत सुधारणा होत नाही हेही तेवढेच सत्य आहे.
भंडारा शहरांतर्गत जाणाऱ्या राज्य मार्गावर विद्यमान स्थितीत खड््यांची संख्या मोठी आहे. भंडारा-तुमसर बायपास या राज्यमार्गावर तीन मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. भंडारा ते वरठी या मार्गावर असे खड्डे हमखास पाहावयास मिळतील. शहरातील सहकारनगरकडे जाणाऱ्या वळणावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. तसेच वरठी मार्ग, शास्त्रीनगर चौक येथेही गिट्टी उखडल्याने रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गिट्टी उखडल्याने वाहन स्लीप होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. रस्त्यावर चुरी पसरण्याचा प्रकार हा तर वेगळाच मुद्दा आहे.
या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना तो खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही, परिणामी खड्ड्यांच्या दचक्यामुळे पाठीचे आजार बळावले आहेत. विशेषत: आबालवृद्धांमध्ये मणक्याचे आजार दिसून येत आहेत. वैद्यकीय अधिकारीही या बाबीला दुजोरा देत आहेत. मागीलवर्षी भंडारा जिल्ह्यातील राज्यमार्गांच्या फक्त डागडुजीसाठी चार कोटीच्या वर खर्च करण्यात आला होता. यंदा हा आकडा किती राहणार याकडे कंत्राटदारांचे लक्ष आहे. तसेही डागडुजीवर खर्च करण्यात व त्यातून मलाई खाण्यात अधिकारी व कंत्राटदार नेहमी चातकाप्रमाणे वाट बघत असतात.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतर्गत साकोली ते तुमसर राज्य मार्गावर खड्ड्यांची भरमार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील रस्ते इतर राज्यांच्या तुलनेत लाखपटीने बरे आहेत, असा शेरा वारंवार ऐकायला मिळतो. मात्र पावसाळ्यात हा शेरा हमखासपणे कुणीही देत नाही.
कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पाडणारा प्रकार पावसाळ्यानंतर सर्वांसमक्ष येतो. साकोली-तुमसर मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असताना संबंधित विभाग बांधकामावर तद्वतच गुणवत्तेवर भर का देत नाही हा खरा सवाल आहे. विशेषत: मलिदा खाण्यावर भर राहतो ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे.
भंडारानंतर राष्ट्रीय महामार्गावर लाखनी व साकोली ही दोन महत्त्वाची शहरे वसली आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या दोन्ही शहरांतर्गत रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात लाखनी व साकोली शहरातून राज्यमार्ग जोडले गेले असल्याने रहदारीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय महामार्गाला (कलकत्ता-मुंबई) जिल्ह्यांतर्गत असणारे राज्यमार्ग जोडल्याने महामार्गावरील वाहतूक अन्य जिल्ह्यांशी जोडली गेली आहे. परिणामी जड वाहतुकीमुळे राज्य मार्गाचे हाल झाले आहेत. राज्य मार्गावरुन जड वाहतूक करु नये, असा काही नियम नाही. मात्र रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार नसल्याने रस्त्यांचे हाल होत आहेत. पहिल्याच पावसानंतर राज्यमार्गावर खड्डे निर्माण झाल्याने त्याचा फटका जनसामान्यांनाही बसत आहे. राज्य मार्गावर अनेक गावे वसली असल्याने त्याचा सरळ सरळ फटका येथील ग्रामस्थांंना बसतो.
बांधकाम विभागाच्या संपूर्ण प्रक्रियेनंतर डागडुजीचे काम हाती घेण्यात येते. तोपर्यंत त्या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असतात.
साकोली-कोसमतोंडीमार्गे गोंदिया जाण्यासाठी बहुतांश नागरिक या राज्यमार्गाचा वापर करतात. मात्र या मार्गावरील सातलवाडा मार्गावर अनेक लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. सालाबादप्रमाणे याहीवर्षी बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, मात्र जनतेचा पैसा असा व्यर्थ का जातो असा जाब विचारणारा कोणीही समोर येत नाही. परिणामी रस्त्यांची मलमपट्टी करुन मलिदा खाण्याचा प्रकार याहीवर्षी निश्चितपणे होणार हेही तेवढेच सत्य आहे.
भंडारा-पवनी या राज्यमार्गाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र पवनीहून भंडारकडे येत असताना रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रहदारीला अडथळा होत आहे. पसरलेल्या गिट्टीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.