रोहयोच्या कामात पावणे दोन लाखांचा गैरव्यवहार
By Admin | Updated: March 10, 2016 00:51 IST2016-03-10T00:51:49+5:302016-03-10T00:51:49+5:30
रोजगार हमी योजनेत एकाच कामाचे दोनदा देयके उचल करण्याचा प्रकार डोंगरला ग्राम पंचायत अंतर्गत गावातील विकास कामात उघडकीला आला आहे.

रोहयोच्या कामात पावणे दोन लाखांचा गैरव्यवहार
चुल्हाड (सिहोरा) : रोजगार हमी योजनेत एकाच कामाचे दोनदा देयके उचल करण्याचा प्रकार डोंगरला ग्राम पंचायत अंतर्गत गावातील विकास कामात उघडकीला आला आहे. पावणे दोन लाख रुपयांच्या गैरव्यवहारात तत्कालीन बिडीओ व विस्तार अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता असून चौकशीत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी सहसरपंच व सचिवांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप दोषी कर्मचारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे.
डोंगरला ग्रामपंचायत अंतर्गत गावात रोजगार हमी योजनेत सन २०१३-१४ या कालावधीत सहसराम रहांगडाले ते बंडु उके यांचे घरापर्यंत ८५ मिटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामात कुशल कामात ४० मजुरांचे नावे २ लाख ६० हजार ९८७ रुपये व अन्य साहित्य खरेदीचे राशी असे एकुण २ लाख ९९ हजार ८७७ रुपये खर्च करण्यात आले आहे. या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली असून गावात या निधी अंतर्गत बांधकाम करण्यात आला आहे. या रस्त्याने गावकरी ये जा करीत आहेत. परंतु पुन्हा याच सिमेंट रस्त्याचे देयकाची उचल करण्याची नवी शक्कल लढविण्यात आली आहे. पुन्हा याच सिमेंट रस्त्याचे तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. यात सहसराम रहांगडाले ते बंडू ऊके यांचे घरापर्यंत लोकेशन दाखविण्यात आले असून ५५ मिटर चे बांधकाम दाखविण्यात आले आहे. यात १ लाख ९८ हजार ८६१ रुपये खर्च झाले असल्याची नोंद कॅश बुकमध्ये सचिव यांनी केली आहे. प्रत्यक्षात एकच लोकेशन असताना या गैरव्यवहाराची तक्रार अंकुश बनकर यांनी केली आहे. पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी यांचे नेतृत्वात रोहयोच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अधिक माहिती व प्रतिक्रियासाठी तांत्रिक अधिकारी अरुण शहारे यांना संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद होते. (वार्ताहर)