कान्हळगाव परिसरातील रोहित्र सहा महिन्यांपासून बंद

By Admin | Updated: August 19, 2014 23:32 IST2014-08-19T23:32:50+5:302014-08-19T23:32:50+5:30

कृषी पंप धारकांना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. मात्र मागील मागील सहा महिन्यांपासून कान्हळगाव (मुंढरी) परिसरातील तीन रोहित्र बंद आहेत.

Rohitra closed in Kanhalgaon area for six months | कान्हळगाव परिसरातील रोहित्र सहा महिन्यांपासून बंद

कान्हळगाव परिसरातील रोहित्र सहा महिन्यांपासून बंद

करडी (पालोरा) : कृषी पंप धारकांना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. मात्र मागील मागील सहा महिन्यांपासून कान्हळगाव (मुंढरी) परिसरातील तीन रोहित्र बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर पावसाअभावी रोहित्र बंद असल्याने जलसंकट ओढवले आहे. रोहित्र सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, मुंढरी परिसरातील शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या त्रासामुळे वैतागले आहेत. करडी विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी अनेकदा समस्येची माहिती दिली. मात्र त्याकडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही अत्यल्प पाऊस पडल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची रोवणीचे कामे खोळंबली आहेत. कृषीपंपधारकांना वीज वितरण कंपनी विद्युत पुरवठा केल्यास अनेकांची पिके वाचू शकतात. मात्र मागील सहा महिन्यांपासून येथील रोहित्र बंद आहेत. रोडवरील नेतराम भोयर यांच्या शेतातील रोहित्र एक महिन्यांपासून बंद आहे. रोकडे यांच्या शेताजवळील डिपी बंद असून दोन्ही रोहित्रांवर अंदाजे ३५ ते ४० शेतकऱ्यांना कृषीपंपांची जोडणी आहेत. मुंढरी ते बोरगाव मार्गावरील वामन तितीरमारे यांच्या शेताजवळील रोहित्र नादुरुस्त आहे.
तिन्ही रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर जलसंकट ओढावले आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने शेतजमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाळा असूनही उन्हाळ्याचे दिवस असल्याची प्रचिती सध्या येत असल्याने शेतातील पिके करपू लागली आहेत.
करडी येथील विद्युत शाखा अभियंता व मुंढरी परिसरातील असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेकदा या संबंधी माहिती देऊनही दुरुस्तीची मागणी पूर्ण केली नाही. मुंढरी सर्कलसाठी दोन लाईनमेनची नियुक्ती आहे. मात्र दोन्ही कर्मचारी अनेकदा कर्तव्यावर उपस्थित नसतात. मागील सहा महिन्यापासून रोहित्र बंद असल्याने अनेक कृषीपंपधारकांसमोर संकट ओढावले असल्याने ४८ तासात तिन्ही रोहित्रांची दुरुस्ती करून ते पूर्ववत करावे अन्यथा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Rohitra closed in Kanhalgaon area for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.