बोथली-पांजरा येथे रोहयो कामात गैरप्रकार
By Admin | Updated: September 20, 2014 23:45 IST2014-09-20T23:45:35+5:302014-09-20T23:45:35+5:30
तालुक्यातील बोथली-पांजरा ग्राम पंचायत अंतर्गत रोहयो कामात रोजगार सेवकाने गैरप्रकार केल्याचे निदर्शनात आले आहे. रोजगार सेवक विक्रम तितीरमारे यांनी रोजगार हमी योजनेच्या हजेरी बुकवर

बोथली-पांजरा येथे रोहयो कामात गैरप्रकार
तथागत मेश्राम - वरठी
तालुक्यातील बोथली-पांजरा ग्राम पंचायत अंतर्गत रोहयो कामात रोजगार सेवकाने गैरप्रकार केल्याचे निदर्शनात आले आहे. रोजगार सेवक विक्रम तितीरमारे यांनी रोजगार हमी योजनेच्या हजेरी बुकवर बोगस मजुराची नावे नोंदवून त्यांच्या नावावर पैशाची उचल केली. कामावर हजर मजुरांची नावे वगळली असून अनेकांची मजुरी मिळाली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात मृत महिलेला कामावर हजर दाखवून एका महिलेला प्रसुतीच्या दुस-या दिवशी कामावर दाखवण्यात आले आहे. या संदर्भात पुराव्यासोबत तक्रार करुनही कारवाई झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.
बोथली-पांजरा ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून विक्रम तितीरमारे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याकाळात झालेल्या अनेक कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर हजर मजुराचे २०१२ पासून मजुरी मिळाली नाही. पण त्यांचा नावाने मंजुर निधीतून पैशाची उचल झाल्याचे समजते. यात एकूण २९ मजुराचा समावेश आहे. याना २०१२ पासुन मजुरीचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
रोजगार हमी योजना ही गावातील शेतमजुर व रोजगार इच्छुक लोकांना कामासोबत दाम देणारी शासनाची सर्वोत्कृष्ट योजना आहे. या अंतर्गत ठेकेदारी पध्दतीला लगाम लावून गावाचा विकास गावक-यांच्या कष्टातून व त्यासाठी त्यांना मोबदला म्हणून पैसा अशी योजना आहे. पण यात ही वाढलेल्या गैरप्रकारामुळे या योजनेला ग्रहण लागले आहे. कामावर लक्ष ठेवण्यासाठी रोजगार सेवक, त्यावर ग्राम पंचायतचे नियंत्रण आणि यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरावर असलेले पंचायत विभाग, त्यानंतरही निर्माण होणारे घोळ हे सर्वांच्या सहभागावर सहमती असल्याचे दिसते. मजुरांनी तक्रार करुनही चौकशी न झाल्यामुळे या प्रकरणाचे मुळे खोलवर रुजल्याचे दिसते. या प्रकरणात दोषी रोजगार सेवकासह ग्राम सेवक व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. पण ज्या विभागाकडे हे काम आहे. त्या विभाग प्रमुखाला चौकशी अधिकारी असल्यास आरोप कसे सिध्द होतील, असा प्रश्न गावकऱ्यांनी केला आहे. एक महिण्यापासून तक्रार देऊनही चौकशी न झाल्यामुळे गावकऱ्यांत रोष आहे.
मस्टर रजिस्टरमध्ये घोळ
रोजगार सेवक विक्रम तितीरमारे यांच्या कार्यक्रमात झालेल्या अनेक कामाच्या मस्टर रजिस्टरमध्ये घोळ असल्याचे उजेडात आले आहे. कामावर गैरहजर मजुरांना हजर व हजर मजुरांना गैरहजर दाखविण्यात आले. यात रामदास वैद्य, सुस्वता मते, हिरामण माटे, जितेंद्र वैद्य, ओमप्रकाश गाढवे, राकेश वैद्य, सुनंदा तितीरमारे हे कामावर नसतानाही त्यांच्या नावे मजुरी काढण्यात आली आणि मनीष शेंडे, दामू माटे, गुलाब बाभरे, प्रमोद माटे, जगदीश बाभरे, महादेव जगनाडे, शिला माटे, प्रभावती वैद्य यांना हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आल्याची सरपंच यांच्या तक्रारीत नमूद आहे.
कामावर हजर दाखवलेल्या काही मजूर हे वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत कामावर जातात तर काही दुसरीकडे कामावर आहेत. यात अरुण घोडेस्वार, चंद्रशेखर वैद्य, महादेव माटे व सुधीर बाभरे यांचा समावेश आहे. त्यांना रोहयोचे मजूर म्हणून दाखविण्यात आले आहे. मस्टर बुकवरील घोळ संपत नाही.
कॅन्सर आजाराने ग्रस्त महिलेला दि.१४ ते २० मे पर्यंत कामावर हजर दाखवण्यात आले. त्याचबरोबर सुलोचना माटे नामक विवाहितेला प्रसूतीच्या दोन दिवसानंतर हजर दाखविण्यात आले. त्यांची प्रसूती ३ मे रोजी झाली. त्यांना ६ ते १२ मेपर्यंत कामावर हजर दाखवण्यात आले. सुलोचना माटे यांचा मस्टर क्रमार ४४३३ व गीता वैद्य यांना क्रमांक ४५८८ नोंद आहे.