राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद
By Admin | Updated: June 18, 2015 00:36 IST2015-06-18T00:36:41+5:302015-06-18T00:36:41+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे बांधकाम केले. रस्ते बांधकाम, दुरुस्ती व देखभालची जबाबदारी खासगी..

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद
नाल्यात घनकचरा : रात्री होतो त्रास, खोलगट जागेमुळे पाणी साचते, उड्डाण पुलाखाली अंधाराचे साम्राज्य
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे बांधकाम केले. रस्ते बांधकाम, दुरुस्ती व देखभालची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला दिली असून तसा करारनामा करण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यापासून पथदिवे व उड्डाण पूलाखालील दिवे बंद अवस्थेत आहे. परिणामी रस्त्यावरील वाहनधारक व पादचारी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुजबी येथील ४८५ मैल दगडापासून ते नागपूर येथील ५४३.६३० मैल पारडी नाका पर्यंत दगड रस्त्यावर उड्डाण पुलाखाली व बायपास रस्त्यावरील बोगद्यामध्ये विद्युत व्यवस्था खासगी कंत्राटदारातर्फे करारनाम्यानुसार करण्यात यायला पाहिले. मात्र, ठाणा पेट्रोलपंप, खरबी (नाका), शहापूर, फुलमोगरा येथील पथदिवे मागील महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. ठाणा पेट्रोलपंप येथील उड्डाण पुलाखालील एका बाजूचे पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तथा वाहनधारकांना गाव व गावचे नामफलक वाचण्यास कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अस्तित्वात असलेले पथदिवे रात्री अपरात्री बंद केले जाते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील चोरटी आयात निर्यातीला व गाव खेड्यातील चोरट्या भामट्यांना रान मोकळे झाले आहे. माथनी येथील टोलनाका सुरु झाला आहे. संक्षिप्त टिप्पण क्रमांक २.०१ मध्ये उल्लेखीत करारानुसार वैद्यकीय सोयीसुविधा, रस्ता बांधकाम, रस्त्यावरील पथदिवे, नाल्याचा रखरखाव, रस्त्यावरील अडथळे दूर करण्याकरिता मोबाईल पथक चालविणे याकरिता हलके व जड चारचाकी व वरील वाहन धारकाकडून करारस्वरुपात पथकर घेतला जातो. मात्र सद्य:स्थितीत महामार्गावरील नवीन नाल्यामध्ये घनकचरा साचलेला आहे.
काही ठिकाणी अपुरे व योग्य दिशा नसलेल्या नाल्या भूईसपाट झालेल्या आहेत. पावसाचे आगमन झालेले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पाणी हे रहदारी किंवा रस्त्यावरच साचत आहे. बायपास रस्त्यावरील बोगदा व खोलगड असल्यामुळे पाणी साचून राहत आहे. परिणामी पादचारी, दुचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी एकाच ठिकाणी संग्रहित करून परिसरातील पाण्याची पातळी वाढीसाठीची रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ५०० मिटर मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतूद आहे. मात्र असे कुठेच बांधकाम करण्यात आलेले नाही. रस्त्यावरील पाणी मोकाट सोडण्यात आलेले आहे. बंद अवस्थेत पडलेले पथदिवे, असुविधाजनक असलेले ठिकाणाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)