पालक सचिव यांनी घेतला विकास कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:10 IST2017-11-28T00:10:30+5:302017-11-28T00:10:44+5:30
जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा सोमवारी पालक सचिव रजनीश सेठ यांनी घेतला.

पालक सचिव यांनी घेतला विकास कामांचा आढावा
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा सोमवारी पालक सचिव रजनीश सेठ यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषिपंप, प्रधानमंत्री आवास योजना यासह विविध योजनांची माहितीही जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने जलयुक्त शिवार मधील कामाची प्रगती, मागेल त्याला शेततळे, धडक विहिर, बोडी योजनेचा आढावा, कृषिपंपासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलबध करुन देणे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जिल्हयातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान शेतकरी आत्महत्या, तलाव तेथे मासोळी अभियान, जिल्हयातील रेशीम उद्योग व धान खरेदी आदीबाबत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विविध योजनांच्या प्रगतीचे सादरीकरण केले. जिल्हयात रेशीम उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आदी रोजगारक्षम कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच पर्यटनाला वाव देण्याचा प्रयत्न होत आहे. रावणवाडी इको टूरिझम म्हणून विकसित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचा त्यांनी सांगितले. पर्यटन विकासात पक्षी निरिक्षण, नेचर ट्रेल, लोकल फूड व धार्मिक पर्यटन याबाबीवर भर दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
शिक्षण आरोग्य व रोजगार या क्षेत्रात जिल्हयात काम करण्याचे प्रशासनाने नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. भंडारा जिल्हयात उद्योग विकासाला अधिक संधी नसल्यामुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय व रेशीम उद्योग या बाबीवर लक्ष केंद्रीत करुन रोजगाराची संधी वाढविण्याच्या सूचना पालक सचिवांनी यावेळी केल्या.
भंडाºयाची वाळू अतिशय प्रसिध्द असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, यावेळी ३४ रेतीघाट लिलावात चारपटीने महसूल वाढला आहे. प्रत्येक घाटावर सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून रेती वाहतूक वाहनावर जीपीएस प्रणाली लावण्यात येणार आहे. पावती बारकोडेड असणार असून परिवहन अधिकाºयांमार्फत नियंत्रण व देखरेख ठेवण्यात येणार आहे. नोंदणी परिवहन विभागाकडे नोंदणी केलेले वाहनच वाळू वाहतूक करु शकतील, अशा प्रकारची यंत्रणा असणार आहे. यावर बोलतांना पालक सचिव म्हणाले की, अवैध वाळू वाहतूकीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी. वाळू माफियांची संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कडक उपाय योजना आखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर पालक सचिव यांनी पशुवैद्यकीय दवाखाना, मानेगाव बाजार, आर्दश जिल्हा परिषद शाळा खराशी, रेशीम ग्राम किटाळी व टसर उत्पादन गिरोला आदी ठिकाणी भेटी दिल्या. या ठिकाणी होत असलेल्या विविध विकास कामांना भेटी देवून समाधान व्यक्त केले. बैठकीपूर्वी पालक सचिव यांच्या उपस्थितीत संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पालक सचिवांनी उपस्थितांना संविधान दिनाची व निष्ठेची शपथ दिली.