लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील नदीपात्रामध्ये मुबलक वाळू उपलब्ध असताना ७ लाख ब्रास वाळू दाखविली जात आहे. हे आपल्याला मान्य नाही. आपल्या मते, किमान २५ लाख ब्रास वाळू येथे आहे. मात्र ती कमी दाखवून चोर्या करण्यासाठी रान मोकळे केले जात असेल, तर हा पमकार योग्य नाही, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी खनिकर्म आणि महसूल विभागावर ताशेर ओढले.
जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील गौण खनिजांच्या मुद्द्यावर घेतलेल्या आढाव्यादरम्यान त्यांच्यापुढे ही आकडेवारी आली. त्यावर त्यांनी नापसंती दर्शविली. पत्रकार परिषदेतही त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला. ते म्हणाले, वाळू घाटांच्या लिलावात आपण बदमाशी होऊ देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुन्हा सर्वे करावा. एमआर, गुगल तसेच जीएसडीचा सपोर्ट या सर्वेसाठी घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.
सामान्य नागरिकांची कामे पारदर्शकपणे करा :
- महसूलमंत्री विशेष महसूल सप्ताहादरम्यान सामान्य नागरिकांची कामे पारदर्शक आणि तातडीने पूर्ण करा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात दिले.
- कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक नुरूल हसन, माजी खासदार सुनील मेंढे, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके-ढेंगे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर महसूलसंबंधी कामे कोणतीही दिरंगाई न करता पार पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले.
- महसूलमंत्री बावनकुळे यांनी, गोसेखुर्द प्रकल्पाच्या अंतर्गत गणेशपूर व पिंडकेपार या गावांतील बाधित नागरिकांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. संबंधित कुटुंबातील व्यक्तींना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हावी यासाठी, अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे मंत्र्यांनी सूचविले. भूमी अभिलेख कार्यालयातील रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा तक्रारींवर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
फुके, भोंडेकर यांच्यात शाब्दिक वादजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आमदार परिणय फुके यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे. भोंडेकर हे स्थानिक मुद्दे मांडत असताना फुके यांच्याकडून काही मुद्दे सुचविले जात होते. त्यावर, हे माझे प्रश्न आहेत, मध्ये का हस्तक्षेप करता, असे भांडेकर यांनी विचारले. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आमदार भोंडेकर बैठक सोडून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.