Revenue administration united against sand smugglers | रेती तस्करांविरोधात महसूल प्रशासन एकवटले
रेती तस्करांविरोधात महसूल प्रशासन एकवटले

ठळक मुद्देचिचोलीचे प्रकरण : तहसीलदारांनी दिली पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर धावून जाणाऱ्या रेतीतस्काराविरुध्द महसूल प्रशासन एकवटले असून खुद्द तहसीलदारांनी तुमसर पोलीस ठाण्यात रेती तस्करांविरुध्द तक्रार दिली आहे.
तुमसर तालुक्यातील चिचोली फाट्यावर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या भरारी पथकाने टिप्पर क्रमांक एम एच ३६ एए ०५४८, एम एच ३६ एफ ८६९२ आणि एम एच ३६ एए १२९२ रेती वाहतूक करताना थांबविले. वाहतुक परवाना आणि वाहनांची कागदपत्रे नसल्याचे चालकांनी तहसीलदारांना सांगितले. टिप्परचा पंचनामा केल्यानंतर तलाठी व कोतवालांना टिप्परमध्ये बसवून तुमसर तहसील कार्यालयात घेवून जाण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान चिंचोली येथील बाजार चौकात टिप्पर येताच अचानक थांबविण्यात आले. एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच इसमांनी हातात हातोडा घेवून ट्रकमध्ये बसलेल्या तलाठी व कोतवालाला धमकावून खाली ओढले. तर एका तरुणाने टिप्पर चालकांना रेती रस्त्यावर रिकामे करण्याचे सांगितले. त्यावरुन टिप्पर चालकांनी भर रस्त्यावर रेती टाकणे सुरु केले. त्यावेळी तहसीलदार गजेंद्र बालपांडे, कोतवाल अजय मावळे, तलाठी पंकज बावनकुळे, अरुण गुप्ता, सचिन बागडे, राजेंद्र कदम, कोतवाल संजय बोरकर यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी रेतीतस्कर तहसीलदारांच्या अंगावर धावून आले. बाजाराचा दिवस असल्याने नागरिक मदतीला धावुन आल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान भर रस्त्यात रेती टाकून टिप्पर चालक पसार झाले त्यामुळे आंतरराज्यीय रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. काही वेळानंतर जेसीबीच्या मदतीने रेती दुर करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मंगळवारी तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारी रेती चोरी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, आदेशाची अवमानना करणे, तलाठी व कोतवालाला धमकावणे, हातोडा घेवून अंगावर धावून येणे आदी तक्रारी नमुद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे टिप्पर क्रमांकात तफावत असून वाहनाच्या कागदपत्रात खोडतोड दिसून आली. वाहनाची नोंदणीही झाली नसल्याचे पुढे आले. तहसीलदाराच्या अंगावर रेती तस्कर धावून जाण्याच्या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता चिंचोली येथे रेतीमाफीया अंगावर धावून आले. जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या सहकार्याने अनर्थ टळला. आपण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.
- गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार, तुमसर

Web Title: Revenue administration united against sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.