भंडारा जिल्ह्यात १४५ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST2021-01-19T04:36:50+5:302021-01-19T04:36:50+5:30
फोटो - १८बीएचपीएच१४. कॅप्शन : पवनी तहसील कार्यालयाबाहेर विजयी उमेदवार हार घालून मोठ्या विश्वासाने बाहेर निघाला. भंडारा : ग्रामपंचायत ...

भंडारा जिल्ह्यात १४५ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर
फोटो - १८बीएचपीएच१४. कॅप्शन : पवनी तहसील कार्यालयाबाहेर विजयी उमेदवार हार घालून मोठ्या विश्वासाने बाहेर निघाला.
भंडारा : ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर लढली गेली नसली तरी आता निकालानंतर सर्वच पक्ष आपल्या वर्चस्वाचा दावा करू लागले आहेत. निकालानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि भाजपने वर्चस्वाचा दावा केला आहे. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींपैकी १४५चा निकाल सोमवारी जाहीर झाला, तर तीन ग्रामपंचायती यापूर्वीच अविरोध झाल्या होत्या. निवडणूक निकालानंतर ढोल-ताशाच्या गजरात विजयी उमेदवारांचे गावागावांत स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी मतमोजणीच्या ठिकाणी सकाळपासूनच मोठी गर्दी होती.
१४५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. सोमवारी सात तहसील कार्यालयांत सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. तुमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, तर सहा ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व निर्माण केल्याचा दावा आहे. मोहाडी तालुक्यातील १७ पैकी दहा ग्रामपंचायतींवर आघाडी, तर सहा ठिकाणी भाजप, भंडारा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतींवर भाजप, तर १३ ग्रामपंचायतींत आघाडीने वर्चस्व निर्माण केल्याचे सांगण्यात आले. पवनी तालुक्यातील २७ पैकी २२ ग्रामपंचायतींवर आघाडीने, तर पाच ग्रामपंचायतींत भाजपने बाजी मारली. साकोली तालुक्यातील २० पैकी सात ग्रामपंचायतींवर आघाडी, तर १३ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. लाखनी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींवर भाजप आणि चार ठिकाणी आघाडी, तर लाखांदूर तालुक्यातील ११ पैकी सहा ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी आणि चार ठिकाणी भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात आले.