लाखांदूर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींचे निकाल घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST2021-01-19T04:36:39+5:302021-01-19T04:36:39+5:30
लाखांदूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१अंतर्गत तालुक्यात घेण्यात आलेल्या ११ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ...

लाखांदूर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींचे निकाल घोषित
लाखांदूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१अंतर्गत तालुक्यात घेण्यात आलेल्या ११ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सदर निकालांतर्गत तालुक्यात कॉंग्रेसप्रणीत पॅनलचे वर्चस्व स्थापित करीत सहा ग्रा.पं., तर भाजपप्रणीत ४ व एक त्रिशंकू ग्रामपंचायत काबीज झाल्याची माहिती आहे.
तालुक्यात ११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गत १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण २२३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र नऊ उमेदवार चार जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या उमेदवार अर्ज छाननीत अविरोध झाल्याने प्रत्यक्ष २१४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
सदर ११ ग्रामपंचायतींअंतर्गत ३५ प्रभागांतून ९९ सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. कॉंग्रेसप्रणीत ग्रामपंचायतींमध्ये सोनी, इंदोरा, चिचोली, अंतरगाव, कोच्छी, दांडेगाव, चिचाळ, कोदामढी, बेलाटी, मान्देड, सावरगाव आदींचा तर भाजपप्रणीत ग्रामपंचायतींमध्ये कन्हाळगाव, चिचगाव, पुयार, पारडी, गुन्जेपार, किन्ही व मुर्झा या संमिश्र ग्रा.पं.चा समावेश आहे. तालुक्यातील पुयार येथे भाजपप्रणीत पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापित करताना कॉंग्रेसप्रणीत पॅनलअंतर्गत केवळ तालुका युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख विजयी ठरले आहेत. गुन्जेपार, किन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे तालुका समन्वयक उत्तम भागडकर यांना जबर धक्का देत नंदू तोंडरे यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे.
मुर्झा ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेस, भाजपा व अपक्ष आदींची प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाल्याने येथील सरपंच नेमका कोणत्या पक्षाचा होणार? हे मात्र ऐन वेळीच ठरण्याची चिन्हे आहेत. एकंदरीत तालुक्यात घेण्यात आलेल्या ११ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला. निवडणूकीसाठी तहसीलदार निवृत्ती उइके, नायब तहसीलदात देवीदास पाथोडे, अखिल भारत मेश्राम, मनीषा देशमुख व ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
बॉक्स
पारडी ग्रा.पं.मध्ये टॉय
तालुक्यातील पारडी ग्रा.पं. निवडणुकीत येथील प्रभाग क्र.३ मधील उमेदवारांना समान मतदान पडल्याने टॉय झाल्याचे दिसून आले. सदर टॉय या प्रभागातील विशाल यशवंत मेश्राम व अरविंद लक्ष्मण रामटेके या दोन उमेदवारांना प्रत्येकी १३७ मते मिळाल्याने टॉय झाल्याचे दिसून आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोन्ही उमेदवारांच्या संमतीने ईश्वर चिठ्ठी काढून एकाला विजयी घोषित केले. त्यामध्ये अरविंद लक्ष्मण रामटेके या उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीने विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.
बॉक्स
गुलाल उधळून विजयोत्सव साजरा
तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीत विजयी ठरलेल्या सर्वच उमेदवारांचे तत्सम गावातील नागरिकांनी गुलाल लावून व पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर विजेत्या उमेदवारांनी ढोल-ताश्या न वाजवता अगदी साध्या पद्धतीने विजयोत्सव साजरा केला.