तोडलेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:29+5:302021-03-28T04:33:29+5:30
भंडारा : थकीत वीज बिलापोटी महावितरणने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अनेक गावात समस्या ...

तोडलेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु करा
भंडारा : थकीत वीज बिलापोटी महावितरणने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अनेक गावात समस्या निर्माण झाली. याची दखल आमदार डाॅ.परिणय फुके यांनी घेत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले.
वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे अनेक गावात रोष निर्माण झाला. शुक्रवारी आमदार डाॅ. परिणय फुके भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी कवडशी फाट्यावर नागरिकांनी त्यांना भेटून आपली कैफीयत मांडली. लगेच महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्याशी फोनवर चर्चा केली. परंतु तोडगा निघाला नाही. त्यामुळे आमदार डाॅ.फुके यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम, अधीक्षक अभियंता राजेश नाईक, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सचिन पानझाडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांकडे पैसे नाहीत. त्यामुळे कराची वसुली झाली नाही. परिणामी वीज बिल थकले. अशा गावातील वीज पुरवठा खंडित करु नये आणि वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करावा असे निर्देश देण्यात आले. या बैठकीनंतर काही गावातील वीज पुरवठा सुरु झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनोद बांते, चंद्रप्रकाश दुरुगकर, अमीत वसानी, बबलू आतीलकर, विनोद भुरे, संजय कुंभलकर, रुबी चढ्ढा, खैरीच्या सरपंच प्रमिला शहारे, पिंपरीच्या सरपंच मेश्राम, ठाणाच्या सरपंच पवार, सालेबर्डीच्या सरपंच बोरकर आदी उपस्थित होते.