शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2015 00:38 IST2015-05-21T00:38:27+5:302015-05-21T00:38:27+5:30
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१५-१६ च्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये ...

शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प
६४ ग्रामपंचायती : १५,०७३ वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट
भंडारा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१५-१६ च्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये जिल्ह्यातील एकूण ६४ ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या ६४ ग्रामपंचायतीमधील वैयक्तिक शौचालय बांधकामाचे एकूण उद्दिष्ट ५०७३ असे असून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच ते पूर्ण करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. त्याकरिता लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष जावून बांधकामाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०२५-१६ मध्ये वार्षिक कृती आराखड्यामध्ये जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायती समाविष्ट असून मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एच. आडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ग्रामपंचायतमधील वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच शौचालय बांधकाम तांत्रिक दृष्ट्या योग्य व्हावे जेणे करून लाभार्थ्यांना त्याचा वापर करता यावा, यासाठी प्रत्येक तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीची निवड करून जे लाभार्थी लवकर शौचालय बांधायला तयार आहे, अशा लाभार्थ्यांची ग्रामपंचायतमधून निवड करून त्यांचे घरी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या टिमने वैयक्तिक शौचालय बांधकामाचे प्रात्यक्षिक दिले.
मोहाडी तालुक्यातील रोहणा ग्रामपंचायतमधील लाभार्थ्यांना शौचालयाचे प्रात्यक्षिक दिल्यानंतर लगेच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली असून येथील उपसरपंच नरेश ईश्वरकर यांनी जो लाभार्थी शौचालय बांधकाम लवकर पूर्ण करेल त्याला रूपये १००० बक्षिस देण्यात येईल, असे घोषित केले. तसेच इतर ग्रामपंचायतला देखील प्रात्यक्षिक दिल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे यावर्षात जिल्ह्याचे उद्दिष्टे माहे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असे प्रयत्न चालु आहे. प्रात्यक्षिक देतेवेळी पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, सचिव, रोजगारसेवक, शिपाई, लाभार्थी, गट समन्वयक, समूह समन्वयक आणि जिल्ह्याचे तज्ञ सल्लागार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)