विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन
By Admin | Updated: June 21, 2014 01:02 IST2014-06-21T01:02:16+5:302014-06-21T01:02:16+5:30
गोसी खुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चिचखेडा या गावाच्या समस्या सोडविण्याकरीता मागण्यांचे निवेदन

विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन
पवनी : गोसी खुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चिचखेडा या गावाच्या समस्या सोडविण्याकरीता मागण्यांचे निवेदन गोसीखुर्द संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे व युवा आघाडीचे गुलाब मेश्राम यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव यांना वाही विश्रामगृहात देण्यात आले.
या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन गावठाणात ६० टक्केच्या वर प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत झाल्यामुळे याला महसुल गावाचा दर्जा देऊन वेगळी ग्रामपंचायत मिळावी. चिचखेडावासीयांची शेती जवळच्याच मुरमाडी येथे आहे. त्यांनाही १२०० कोटी रुपयाच्या पुनर्वसन अनुदान पॅकेजचा लाभ मिळावा. नवीन गावठाणात बौद्ध विहाराला मोबदला, व्याज, पुनर्वसन अनुदान देऊन नवीन गावठाणात भूखंड मिळावा, नवीन गावठाणात नळ योजना, व्यापारी संकुल, सिमेंट क्राँक्रीट नाल्यांची निर्मिती व्हावी, लक्ष्मण ईखार या चिचखेडा येथील प्रकल्पग्रस्ताला सर्व मोबदला मिळाला. त्याचे नाव अवार्डमध्येही असतानाही सुद्धा त्याला १२०० कोटी रुपयाच्या पॅकेजच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या पॅकेजचा लाभ लक्ष्मण ईखार यांना देण्यात यावा. वाढलेल्या २९ कुटुंबाला नवीन गावठाणात भूखंड मिळाले आहेत. त्यांना घर बांधणी अनुदान ६८,५०० रुपये मिळावे व ज्याप्रकारे पाथरी येथील प्रकल्पग्रस्तांना एकमुस्त पॅकेजचा लाभ मिळाला तश्याच प्रकारचा लाभ चिचखेडा येथील प्रकल्पग्रस्तांना मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव यांनी शिष्टमंडळाला दिला आहे. शिष्टमंडळात अनेक प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)