प्रादेशिक पाणीपुरवठा योजना इतिहासजमा
By Admin | Updated: November 24, 2015 00:44 IST2015-11-24T00:44:29+5:302015-11-24T00:44:29+5:30
परिसरातील गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे व गाव पाणी टंचाईमुक्त व्हावे ...

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना इतिहासजमा
योजना भंगारात : गावात अभिनव जलकूंभ, शासनाची निष्क्रियता कारणीभूत
पवनी /पालोरा : परिसरातील गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे व गाव पाणी टंचाईमुक्त व्हावे यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बाम्हणी येथे जीवन प्राधिकरण योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही योजना भंगारात पडली आहे.
बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी थेट बाम्हणी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा येथे साठवून पाणी शुद्ध करून जनतेला पाणी पुरवठा करणे हा शासनाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत जवळपास १४ गावांना पाणीपुरवठा होणार होता. तर उन्हाळ्यात परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाईचे भीषण संकट पाहायला मिळते. गावात पाणी पुरवठा योजना आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई भासत आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावागावात जलकुंभ उभारले आहेत. जवळपास तीस कि.मी. पाईपलाईन टाकल्या गेली आहे. मात्र गावकऱ्यांना अजूनपर्यंत या योजनेद्वारे पाणी मिळाले नाही. गेल्या पाच वर्षापासून ही योजना भंगारात पडली आहे. या योजनेला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले होते. सर्वांनी कमीशनचा लाभ घेऊन दुर्लक्ष केले होते.
लक्षावधी रुपयाची पाईपलाईन जीर्ण टाकण्यात आली होती. परिणामी काही महिन्यातच फुटली. ही योजना सुरु करण्यात यावी म्हणून येथील उपसरपंच द्रोपद धारगावे यांनी पायपीट केली होती. मात्र त्यांना अपयश आले. आता या क्षेत्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे आतातरी काही होणार कां? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
आमदार, खासदार स्थानिक निधीतून गावात लक्षावधी रुपये देऊन भूमिपूजन करीत आहेत. मात्र बाम्हणी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला न्याय देता आले नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाऱ्यांनी आपली कमीशन घेवून गप्प बसले आहेत. शासनाच्या कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ दिसत नाही. ज्या गावात पाण्याची टंचाई आहे त्या गावात नवीन जलकुंभ तयार करण्यासाठी निधी दिली जात आहे. सध्या या योजनेचे साहित्य चोरीला जात आहेत. विजेचे अनेक उपकरणे चोरीला गेले आहेत. केवळ योजनेचा सांगाडा उभा आहे. या योजनेच्या नूतनीकरणासाठी लक्षावधी रुपयाचा खर्च आहे. मात्र वीज देयके थकल्याने वीज वितरण कंपनीने हातवर केले आहे. वीज पुरवठा पूर्वीच खंडीत करण्यात आला आहे. आता वाट आहे ती विद्युत मिटर नेण्याची. या योजनेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. एकीकडे पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याला पुज्य समजणाऱ्या जनतेला पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. या योजनेसाठी राजकीय इच्छेसह पुढाकाराचीही गरज आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)