कारभार प्रभारी शल्यचिकित्सकांवर
By Admin | Updated: October 20, 2015 00:44 IST2015-10-20T00:44:09+5:302015-10-20T00:44:09+5:30
भंडारा जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालय तथा सात ग्रामीण रुग्णालयात वर्ग एकचे शल्यचिकित्सकाची जबाबदारी प्रभारींच्या खांद्यावर आहे.

कारभार प्रभारी शल्यचिकित्सकांवर
रुग्णांचे आरोग्य धोक्यात : राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्र्यांचा जिल्हा
मोहन भोयर तुमसर
भंडारा जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालय तथा सात ग्रामीण रुग्णालयात वर्ग एकचे शल्यचिकित्सकाची जबाबदारी प्रभारींच्या खांद्यावर आहे. राज्याचे आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शासन येथे वर्ग एकचे पद मागील अनेक वर्षापासून भरू शकले नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
भंडारा जिल्ह्यात तुमसर व साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय असून सिहोरा, मोहाडी, पवनी, लाखनी, लाखांदूर, अड्याळ व पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. या रुग्णालयात मागील अनेक वर्षापासून शल्यचिकित्सकांचे पदे रिक्त आहेत. यावरून जिल्ह्याचे आरोग्य कसे असेल याचा अंदाज येतो. जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. खुद्द डॉक्टर या व्यवसायाशी संबंधित आहेत. वर्ग एकचे पद शासन भरण्यास का असमर्थ ठरत आहे. हा संशोधनाचा विषय आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक डॉक्टर्स कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. अशीच व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. शासनाला डॉक्टर मिळत नाही अशी ओरड आहे. जे कार्यरत आहेत त्यांना नियमित केले जात नाही. त्यांना स्पर्धा परीक्षेची अट घातली जाते. ग्रामीण भागात डॉक्टर काम करण्यास इच्छुक नाही ही वस्तूस्थिती आहे.
सध्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपजिल्हा व जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल आहे. कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना अधिकची कामे करावी लागतात. पूर्व विदर्भातील शेवटचे टोक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत असून त्यांच्याकडून अजूनपर्यंत अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.
तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय भंडारा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर क्रमांक दोनचा रुग्णालय आहे. येथे मंजूर पदे १३ आहे. येथे सध्या १० डॉक्टर्स कार्यरत आहेत. त्यापैकी दोन डॉक्टर्सचे स्थानांतरण झाले. येथे सोनोग्राफी मशीन आहे. परंतु डॉक्टर नाही. लाखोंची मशीन धूळखात पडून आहे.
येथील रक्तपेढीने राज्यात प्रथम स्थान पटकाविले. याशिवाय राज्यात चार पारितोषिक पटकाविणारे हे एकमेव उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज हजार ते अकराशे रुग्णांची तपासणी करण्यात येते. आठवड्यातून तीन दिवस डोळे, हायड्रोसील (अंडवृद्धी), हरनिया, सीझर महिन्यातून २० ते २५ करण्यात येतात. येथील डोळ्यांच्या शल्यचिक्रियेत राज्यात नावलौकीक कमाविला आहे. येथे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येते. या रुग्णालयात जवळच्या मध्यप्रदेशातून रुग्ण मोठ्या संख्येत येतात हे विशेष.
१०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. काही रुग्णांना नाईलाजास्तव खाली ठेवून इलाज करावा लागत आहे. अशा रुग्णालयाकडे लक्ष देण्यास शासनाकडे वेळ नाही. येथे अधीक्षकांचे पद दीड वर्षापासून प्रभारी आहे. रुग्णांच्या सेवा पुरवून प्रशासकीय कामे येथे त्यांना करावी लागतात हे विशेष.