निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By Admin | Updated: October 13, 2014 23:17 IST2014-10-13T23:17:00+5:302014-10-13T23:17:00+5:30

बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. तीन विधानसभा क्षेत्रात १,१७० मतदान केंद्र असून ५,६४० कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

Ready for the administration of elections | निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

१,१७० मतदान केंद्र : दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात
भंडारा : बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. तीन विधानसभा क्षेत्रात १,१७० मतदान केंद्र असून ५,६४० कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहेत. निवडणुकीदरम्यान प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, तुमसर, भंडारा व साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात ९ लाख १९,८८१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासाठी ५,६४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय १११ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिनही विधानसभा क्षेत्रात १,१७० ईव्हीएम मशीनची पुर्तता करण्यात आलेली आहे.
मतदान केंद्रापर्यंत आवश्यक साहित्यांसह कर्मचारी पोहचावे, यासाठी निवडणूक विभागाने ३०२ वाहनांची व्यवस्था केली आहे. निवडणूक कार्यात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी मतदारांना ८,५०८ टपाली मतपत्रिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ९६ पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ५५६ पोलीस कर्मचारी, ६४५ होमगार्ड आदींसह १०३ जीपगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्राचे साहित्य वितरण पोलीस कल्याण सभागृहातून होणार आहे. साकोलीचे साहित्य शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सेंदुरवाफा येथून तर तुमसरचे साहित्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून होणार आहे. तिनही विधानसभा क्षेत्रातील व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणूक असल्याने निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. या सुटीचा लाभ उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील परिपत्रकानुसार दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स आदी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे, निवडणूक अधिकारी मिलींद बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, विजय देवळीकर, किसन शेंडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ready for the administration of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.