पत्रकार दिन : वामन तुरिले यांचे प्रतिपादनभंडारा : समाजातील उपेक्षितांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकारांनी करावे. ज्या समस्या समाज स्वत:हून मांडू शकत नाही, त्या समस्यांवर पत्रकारांनी लिखाण करुन दुर्लक्षित व तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे मत ज्येष्ठ पत्रकार वामनराव तुरिले यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमे व विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. समाजातील समस्या, विकास विषयक प्रश्न जनेतेसमोर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सद्याची पत्रकारिता करतांना पत्रकारांचा आर्थिक पाया चांगला असला तर चांगली पत्रकारिता होऊ शकते. यासाठी पत्रकारितेसोबतच पत्रकारांनी एखादा व्यवसाय करावा, असा आपुलकीचा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला. ज्येष्ठ पत्रकार रमेश सुपारे म्हणाले, विकासाच्या बाबतीत पत्रकारांनी शोधपत्रकारिता करावी. शहराचे सौंदर्यीकरण होत आहे की टपरीकरण या विषयावर पत्रकारांनी सजग होऊन लिहिण्याची आज नितांत गरज आहे. पत्रकारांनी डोळे व कान उघडे ठेवून सामान्यांसाठी आपली लेखणी वापरावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपीबद्दल मत व्यक्त करतांना नगरसेवक हिवराज उके म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असलेल्या प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सामना करावा लागत आहे. तेव्हा शोषित, पिडितांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला इंद्रपाल कटकवार, दिपक फुलबांधे, दिपेंद्र गोस्वामी, विजय निचकवडे, सुरेश कोटगले, गोपू पिंपळापूरे, विजय खंडेरा, दिपक रोहणकर, ललित बाच्छिल, सुरेश फुलसुंगे, मेश्राम आदी पत्रकार उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले. त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती दिली. संचालन व आभार प्रदर्शन सुनिलदत्त जांभूळे यांनी केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कल्पना ढाकणे, घनश्याम खडसे, बंडूसिंग राठोड, विजय डेहनकर, सुनिल फुलसुंगे, प्रशांत केवट, घनश्याम सपाटे, रेखा निनावे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
उपेक्षितांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करा
By admin | Updated: January 7, 2016 01:09 IST