दुर्लक्षामुळे विरलीतील वीजपुरवठा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:48+5:302021-08-24T04:39:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : येथील विद्युत उपकेंद्राच्या प्रभारी अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील वीजपुरवठ्यात अनियमितपणा वाढला ...

Rare power supply affected due to negligence | दुर्लक्षामुळे विरलीतील वीजपुरवठा प्रभावित

दुर्लक्षामुळे विरलीतील वीजपुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.) : येथील विद्युत उपकेंद्राच्या प्रभारी अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील वीजपुरवठ्यात अनियमितपणा वाढला असून, वीजवितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अभियंत्यांच्या नियंत्रणाअभावी येथील यंत्रणेत कामचुकारपणा वाढला असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, येथील नागरिकांना विजेच्या समस्यांना समोरे जावे लागत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले असून, महावितरणविषयी असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

या विद्युत उपकेंद्रांतर्गत परिसरातील २३ गावांना वीजपुरवठा केला जातो. यावर्षी जानेवारी महिन्याअखेर येथील अभियंत्यांचे स्थानांतरण झाल्यापासून आजपावेतो येथील अभियंत्याची जागा रिक्त आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या शाखेचा अतिरिक्त कार्यभार सरांडी/बु. येथील अभियंते एस. लाडके यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, लाडके हे सरांडी/बु. येथील कायम अभियंता असल्याने त्यांचा कल सरांडी/बु. उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांकडे जास्त असून, विरली उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांकडे दुर्लक्ष होत असल्याचा परिसरातील जनतेचा आरोप आहे.

साधारणतः गेल्या पंधरा दिवसांपासून विरली (बु.) परिसरातील नागरिकांना रोजच विजेच्या लपंडावाचा त्रास सहन करावा लागत असून, कायम अभियंत्याविना पोरके झालेल्या विरली महावितरण उपकेंद्राविषयी रोष व्यक्त केला जात आहे. यातही भरीस भर म्हणजे विरलीसाठी सेवा देणारा लाईनमनही निलंबित झालेला आहे. त्यामुळे समस्या आणखी बिकट झाली आहे.

आधी बिल भरा, मग समस्या सांगा ?

गावात उद्भवणाऱ्या विजेच्या समस्येविषयी प्रभारी अभियंत्यांना येथील ग्राहकांनी विचारणा केली असता "तुम्ही बिल भरले का? आधी बिल भरा, मग समस्या सांगा", असे अभियंत्यांकडून उलटसुलट उत्तरे मिळत असल्याचे ग्राहक सांगतात.

"वारंवार होणाऱ्या विजेच्या खोळंब्याविषयी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवरून बोलले असता, तुम्ही बिल भरले काय? तिथल्या समस्येची जबाबदारी माझी नाही. या आधी मी तिथे येत होतो. मात्र, आता मी तिथे येत नाही.” अशाप्रकारचे उलटसुलट उत्तर अभियंत्याकडून मिळाले.

- आनंद जांगळे, व्यावसायिक, विरली (बु.)

Web Title: Rare power supply affected due to negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.