लोकगीतांच्या तालावर धानाची रोवणी
By Admin | Updated: July 22, 2015 01:11 IST2015-07-22T01:11:42+5:302015-07-22T01:11:42+5:30
शेतकरी सुखावला : जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

लोकगीतांच्या तालावर धानाची रोवणी
शिवशंकर बावनकुळे साकोली
'पावसाच्या सोबतीन अंग भिजे जागो जागी,
केवळा मोठा गुणवाण, कोण बाई राबविले मना,
केवळा बोले हो केवळा बोले'
असे सुमधूर लोकगीत कानाला एैकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून, ती शेतशिवारात सुरू असलेल्या रोवणी दरम्यान महिलांकडून गायली जात आहे. ही लोकगीत कानावर पडल्याने परिसरातील शेतात रोवणी सुरू असल्याचे लक्षात येते. तालुक्यात धान रोवणी धडाक्यात सुरू असून लोकगीतांनी शेतकऱ्यांचे शिवार गुंजू लागले आहे. या गितांनी आसमंत दुमदुमु लागले आहे.
प्रारंभीचे काही दिवस पावसाअभावी कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत असतानाच आता पावसाने हजेरी लावल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुबलक पावसामुळे अनेकांनी प्रत्यक्ष रोवणीच्या कामाला धडाक्यात सुरूवात केली आहे.
प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात जास्तीत जास्त महिला मजुरांना रोवणीसाठी बोलावू लागले, पऱ्हे काढणाऱ्यांनी पऱ्हे काढले, चिखल केलेल्या बांधीत पेंड्या पसरविल्या आहेत. डोक्यावर मोऱ्याचे वजन घेवून रोवणी करीत मागे जाणाऱ्या महिला
उठ उठ पाकुरा, जा माझ्या मायेरा,
केवळा मोठा गुणबाण,
कोण बाई राबविले मन्हा,
केवळा बोले हो केवळा बोले
असे लोकगीत गात भात रोवणी करीत आहेत. पुढे मालकीन व मागे मालक यांचा, रोवणी लवकर उरकावा यासाठी तगादा सहन करीत केव्हा एकदा पात पडते, यांची प्रत्येक जण वाट पाहताना दिसत आहे. पात पडली की, थोडी उसंत घेणे आणि पुन्हा नवीन पातीसाठी सज्ज होत आहेत. अशिक्षित महिलांनी यमक अनुप्रास यांचा योग्य वापर करून रचलेली सुरेख गाणी कानावर पडताच बहिनाबाई चौधरी यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. एका शेतकऱ्याच्या महिलांनी म्हटलेले हे गीत..
पावसाच्या सोबतीन,
अंग भिजे जागो जागी,
घरातील सुहास चंदनाचा,
शेतकरी धरणी मायेले,
दान पिकाची घरी,
भरो धान्याच्या राशी
तालुक्यात ४० हजार ५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून २४ हजार हेक्टर क्षेत्र धान लागवडीखाली आहे. पेरणीच्या कामांना जोमाने सुरूवात करण्यात आली. शालेय मुले-मुली वार्षिक शैक्षणिक खर्च काढण्यासाठी शेतशिवारात कामावर जात आहेत. अस्सल लोकगीतांची खाण असलेल्या शेतशिवारात सर्वदूर मजूर कोकीळेचे सूर ऐकायला येतात, याच सामूहिक लोकगीतांची मैफील धान रोवणी करताना दिसून येते.
गावच्या पाटलाचा,
शेतशिवारी रोवणा,
राखी बांधाया, येईल बयना,
लागे पावसाचा हेवा,
हर बोला हर हर महादेवा
अशा लोकगीतांनी शेतशिवार चैतन्याने न्हाऊन निघाले आहे. रोवणीच्या वेळी लोकगीत म्हणण्याची पद्धत पूर्वीच्या काळापासून रूजली आहे. अलीकडच्या धकाधकीच्या युगात पुरातन स्त्री शेतावर असे लोकगीत म्हणताना दिसत आहे. इतर मजुरांमध्ये शाळकरी मुली, शिक्षित स्त्री या सुद्धा शेतात रोवणीला जात असल्यामुळे त्यांच्या तोंडी पुरातन रोवणीच्या गीताऐवजी चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. लोकगीत काळानुरूप लुप्त होत चालली आहेत. अनेक काळापासून सुरू असलेल्या लोकगीताच्या संस्कृतीला नव्या पिढीने नाकारले आहे.
रोवणी संपल्याने शेतकरी समाधानी
पावसाने चांगली साथ देवून रोवणी आटोपल्यानंतर बळीराजाला आनंद होतो. रोवणी संपण्याच्या दिवशी चिखलाची पूजा करून तो प्रत्येकाला लावतात आणि अंगावर चिखल टाकला जातो. खांद्यावर नांगर घेवून चालणारी गडी माणसं आणि मागे गीत गाणाऱ्या महिला यांच्या सोबत मालक मालकीण घराकडे जाताना गाणे गात जातात.
कोण्या पाटलाचा, रोवणा सरला गं, पाटलाचा रोवणा सरला,
वजा आणते कोणाची राणी,
वजा आणते पाटलाची राणी
अशी गाणी म्हणत सारे देवळापाशी येतात आणि देवळाला चिखल अर्पण करतात, असे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.