राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना थंडबस्त्यात
By Admin | Updated: October 28, 2015 00:56 IST2015-10-28T00:56:44+5:302015-10-28T00:56:44+5:30
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची भंडारा जिल्ह्यात ४७ प्रकरणे जिल्हास्तरावर थंडबस्त्यात पडून आहेत.

राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना थंडबस्त्यात
तुमसर : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची भंडारा जिल्ह्यात ४७ प्रकरणे जिल्हास्तरावर थंडबस्त्यात पडून आहेत. यात तुमसर तालुक्यातील सर्वाधिक १३ प्रकरणांचा समावेश आहे. उमरवाडा येथे दोन वर्षापूर्वी डोंगा उलटून १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नाही.
राजीव गांधी अपघात विमा योजना केंद्र शासन राबविते. अपघातात मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळतो; परंतु अपघातानंतर किती वर्षानी संबंधित कुटुंबाला लाभ मिळाला पाहिजे याबाबत अनभिज्ञता दिसते. उमरवाडा येथे १३ नोव्हेंबर २०१३ रोजी वैनगंगा नदी पात्रात डोंगा उलटून १३ जणांना जलसमाधी मिळाली होती. यापैकी ५ विद्यार्थी होते. दोन वर्षापासून सानुग्रह अनुदान मिळाले नाही. दि. २९ आॅक्टोबर रोजी भंडारा येथे जिल्हा परिषदेत धनादेश मिळणार असल्याची माहिती आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला ७५ हजार रुपये देण्यात येतात. दि. ३ डिसेंबर २०१३ मध्ये जिल्हाधिकारी, भंडारा यांनी १४ दाव्यांना मंजुरी दिली होती. ९ लक्ष ६० हजारांचे अनुदान वाटपास मंजूरी दिली नंतर २४ फेब्रुवारी २०१४ ला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ८ दावे ६ लक्षाचा अनुदान वाटपास मंजुरी प्रदान केली. किमान मृत्यूमुखी पडलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत शासनाने देणे गरजेचे आहे. येथे केवळ कागदोपत्री जुळवाजुळव करण्यातच वर्षानुवर्षे लागत आहेत. दि. २९ आॅक्टोबरला १५ दाव्यांचे अनुदान वाटप शिक्षण विभागात करण्यात येणार आहे. तसे पत्र संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. उमरवाड्याच्या सरपंच निर्मला टेकाम यांनी प्रकरण लावून धरले. (तालुका प्रतिनिधी)