पावसाने भिजत प्रवाशांना करावी लागते गाडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:54 IST2019-06-30T21:54:09+5:302019-06-30T21:54:28+5:30
रेल्वे प्रशासन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दावा करीत असली तरी मात्र तुमसर रोड रेल्वे जंक्शन रेल्वे स्थानकावर मागील दोन महिन्यापासून नूतनीकरण व नवीनीकरणाच्या नावाखाली टीन शेड काढले, परंतु अद्यापही टीन शेड लावण्यात आले नाही. परिणामी रेल्वे प्रवाशांना भर उन्हात व पावसात रेल्वे गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दररोज सदर रेल्वे स्थानकातून पाच हजार रेल्वे प्रवासी २४ तासात ये जा करतात. लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

पावसाने भिजत प्रवाशांना करावी लागते गाडीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वे प्रशासन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा दावा करीत असली तरी मात्र तुमसर रोड रेल्वे जंक्शन रेल्वे स्थानकावर मागील दोन महिन्यापासून नूतनीकरण व नवीनीकरणाच्या नावाखाली टीन शेड काढले, परंतु अद्यापही टीन शेड लावण्यात आले नाही. परिणामी रेल्वे प्रवाशांना भर उन्हात व पावसात रेल्वे गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दररोज सदर रेल्वे स्थानकातून पाच हजार रेल्वे प्रवासी २४ तासात ये जा करतात. लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष दिसत आहे.
नागपूर विभागात तिसऱ्या क्रमांकावरील तुमसर रोड रेल्वे जंक्शन रेल्वेस्थानक असून मोठ्या प्रमाणात रेल्वेला त्यातून महसूल प्राप्त होतो. मेल, एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचा थांबा येथे आहे. मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी प्लॅटफार्म क्रमांक दोन व तीनवरील टीन शेड रेल्वे प्रशासनाने काढले. नवीन फुटवे ब्रीज तथा नूतनीकरणाकरिता टीन शेड काढल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अतिशय वर्दळीचे रेल्वेस्थानक असूनही अजूनपर्यंत येथे टीन शेड लावण्यात आले नाही. पावसाळा सुरु झाला. रेल्वे प्रवाशांना भर पावसात ओलेचिंब होऊन रेल्वेगाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. संपूर्ण उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांनी उन्हातच गाडीची प्रतीक्षा केली. अत्यंत कासवगतीने येथे कामे सुरु आहेत. अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी टीन शेडची कामे अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही. पुन्हा किती दिवस लागणार असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे. बुलेट ट्रेनच्या काळात साधे टीन शेड येथे लावण्यात येत नाही. अशा जळजळीत प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या.
रेल्वे संदर्भातील समस्या सोडविण्याकरिता येथे कुणीच उत्सुक दिसून येत नाही. दररोज येथून सुमारे पाच हजार रेल्वे प्रवाशी प्रवास करतात. येथील लोकप्रतिनिधींचे रेल्वे प्रशासन ऐकत नाही. सदर विषय केंद्राचा असल्याने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. खासदार सुनील मेंढे यांनी गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा
तुमसर रोड रेल्वे जंक्शनमध्ये समस्या आ वासून उभ्या आहेत. या संबंधी रेल्वे प्रशासनाला माहिती असताना देखील दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तक्रार करावी तरी कुणाकडे ,असा प्रश्न रेल्वे प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.