महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी
By Admin | Updated: September 11, 2016 00:25 IST2016-09-11T00:25:21+5:302016-09-11T00:25:21+5:30
राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली असून यावर्षी २० ते २५ टक्के लागवडी खालील क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले आहे.

महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी
भंडारा : राज्यात सर्वात कमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली असून यावर्षी २० ते २५ टक्के लागवडी खालील क्षेत्र रोवणीपासून वंचित राहिले आहे. १० सप्टेंबरपर्यंत ११२७.९ मि.मी. सरासरी पाऊस पडण्याची गरज असताना यावर्षी ७१६.४ इतका म्हणजे ६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
मागील चार वर्षांपासून पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने नंतर मात्र दगा दिला. सुरूवातीला सधन शेतकऱ्यांची रोवणी झाली. परंतु सुविधा नसलेल्या लहान शेतकऱ्यांनी पावसाची प्रतिक्षा केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे उशिरा का होईना काही शेतकऱ्यांची रोवणी झाली मात्र जिल्ह्यातील २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणीवर खर्च करण्यापेक्षा शेतजमीन पडीक ठेवली. ज्या शेतकऱ्यांची रोवणी पूर्ण झाली त्यांच्या शेतातील धान्य गर्भावस्थेत आहे. आता या पिकाला पावसाची गरज आहे. शनिवारला सायंकाळी बरसलेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)