पावसाने झोडपले
By Admin | Updated: July 24, 2015 00:30 IST2015-07-24T00:30:34+5:302015-07-24T00:30:34+5:30
मागील काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने काल रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी लावली.

पावसाने झोडपले
पवनीत अतिवृष्टी : लाखांदूर तालुक्यात ४१.२ मि.मी. पाऊस
भंडारा : मागील काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने काल रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून रोवणीला वेग येणार आहे. जिल्ह्यात आज २८.५ मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली असून पवनीत ६६ मि.मी. ईतका पाऊस पडला आहे.
लाखांदुरात पावसाची चार तास दमदार हजेरी
लाखांदूर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील एक महिन्यापासून पावसाच्या विश्रांतीनंतर आज गुरुवारला दमदार पावसने चांगलेच झोडपले. केवळ चार तासात ४१.२ मि.मी. पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावह ठरला असून लांबलेल्या रोवणीला आता वेग येणार आहे.
यंदा पावसाने सुरूवात चांगली केली. शेतकऱ्यांना कर्दनकाळ ठरली. पऱ्हे वाढले परंतू पाऊस नसल्याने पऱ्हे करपू लागले. रोवणी खुटली. पऱ्हे टाकल्यानंतर जास्तीत जास्त २० ते २५ दिवसात रोवणी आटोपली तर एकरी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता धूसर झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या होत्या. मजुरांच्या हाताला काम नव्हते. अशातच आज गुरुवारला सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. दुपारी चार तासात ४१.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. नदी व नाले वाहु लागले असून आता रोवणीला वेग येणार आहे.
पवनी तालुक्यात ६६ मि.मी. पाऊस
पवनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, पवनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारला सायंकाळी झालेल्या पावसाने धानपिकांना जीवनदान मिळाले. मागील २४ तासापासून तालुक्यात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आजच्या पावसामुळे धान, सोयाबीन, कापुस, तूर, हळद पिकांना लाभ झाला आहे. या तालुक्यात ८० टक्के शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. इतका पाऊस होऊनही शेतात पाणी साचून नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप रोवणीला सुरुवात केलेली नाही. पवनी तालुक्यात गोसेखुर्द धरण असला तरी या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहावे लागत आहे.
साकोली, लाखनीत पाऊस
साकोली तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, साकोली तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला असून आता एकाचवेळी मजुरांची गरज पडत असल्यामुळे मजुरांसाठी शोधाशोध सुरू आहे. त्यामुळे बाहेरच्या गावाहून मजूर आणने त्यांना जास्तीची मजुरी देण्याचा प्रकार वाढला आहे.
लाखनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मिरेगाव, भुगांव, मेंढा, सोमनाळा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसामुळे शाळेत जाता आले नाही. सानगडी-सिरेगांव मार्गावरील चुलबंद नदीवर पुल नसल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. सानगडी-भुगांव रस्त्यावर मागील दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नदी पलिकडच्या गावाचा सानगडीशी संपर्क तुटला होता. पावसामुळे रोवणीला वेग येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मरेगाव नाला दुथडी
पालांदूर, सानगडी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे मरेगाव नाला ओसंडून वाहत आहे. चुलबंद नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे या मार्गाने सानगडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. सानगडी मोठा गांव असल्यामुळे परिसरातील २० गावातील मुले सानगडीत शिकण्यासाठी येतात. पावसामुळे झाडगांव, पापडा, मिरेगाव, भुगाव, सिलेझरी, घुसोबाटोला, डोंगरगाव, मेंढा, सिवनीबांध, सानगांव, सासरा, कटंगधरा, न्याहारवानी, खंडाला, वटेटेकर येथील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचता आले नाही.